Breaking News

विधानसभा अध्यक्ष पदी कोण डॉ.नितीन राऊत, पृथ्वीराज चव्हाण की संग्राम थोपटे? काँग्रेसच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती सेलच्या अध्यक्ष पदी आता के. राजू यांची नियुक्ती

मराठी ई-बातम्या टीम

विधानसभा अध्यक्ष पदासाठी पुढील आठवड्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. महाविकास आघाडीतील पद वाटपानुसार हे पद काँग्रेसच्या वाट्याला आलेले असले तरी या पदासाठी अद्याप काँग्रेसकडून उमेदवार जाहीर केलेला नसताना काँग्रेसच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती सेलच्या अध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांना आज मुक्त करण्यात आल्याची घोषणा दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी केली आहे. त्यामुळे संभावित उमेदवारांच्या यादीत राऊत यांचेही नाव समाविष्ट झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष पदासाठीच्या उमेदवाराची शिफारस करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिल्ली दौरा केला होता. त्या दौऱ्यात नेमके काय झाले याची अधिकृत माहिती मिळू शकली नसली तरी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ऊर्जा खात्यात जास्त रस असून प्रदेशाध्यक्ष असलेल्या व्यक्तीला राज्य सरकारमध्ये महत्वाचे पद असावे अशी त्यांची मनिषा आहे. तसेच त्यांनी वीज निर्मितीसाठी कोळसा पुरवठ्या करणाऱ्या एका कंपनीच्या विरोधात त्यांनी अर्जही ऊर्जा विभागाला पाठविला होता. त्यावरून काँग्रेसअंतर्गत एकच खळबळ उडाली होती. तसेच ऊर्जा मंत्री राऊत यांच्या सदनिकेवर करण्यात आलेल्या वारेमाफ खर्चाचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामागे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच असल्याच्या वावड्या उठल्या होत्या.

मागील काही महिन्यांपासून विधानसभा अध्यक्ष पदासाठी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सातत्याने सुरु आहे. तर मागील काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव आता चर्चेत आले आहे. त्यामुळे या दोघांपैकी नेमकी विधानसभा अध्यक्ष पदाच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सकुता निर्माण झालेली असतानाच पक्ष संघटनेच्या कामातून डॉ.नितीन राऊत यांना मुक्त करण्यात आल्याने राऊत यांच्या नावाचीही भर आता या यादीत पडली आहे. तसेच मागील काही दिवसांपासून ऊर्जा विभागातही डॉ.राऊत हेच विधानसभेचे अध्यक्ष होणार अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे.

दरम्यान, डॉ.नितीन राऊत यांचा राष्ट्रीय अनुसूचित जाती सेलच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा कालावधी पूर्ण केल्याचे काँग्रेसकडून देण्यात आलेले असले तरी त्यांना विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्याच्या प्रक्रियेतील एक भाग असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. परंतु काँग्रेसकडून अधिकृत नावाची घोषणा होईपर्यत उत्सुकता मात्र कायम राहणार आहे.

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *