Breaking News

हिंदूंच्या प्रेतांची गंगा नदीत अवहेलना करणाऱ्यांना हिंदूचे नाव घेण्याचा अधिकार नाही ‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान’, अभियान नांदेडमध्ये संपन्न

नांदेड: प्रतिनिधी
देशाला मिळालेले स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नसून ते मोठ्या कष्टाने मिळाले आहे, अनेकांनी त्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. या स्वातंत्र्यचळवळीत काँग्रेस पक्षाचा मोठा सहभाग राहिला आहे. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवणारे राज्य असून स्वातंत्र्य चळवळीतही ‘भारत छोडो’सह अनेक महत्वाच्या आंदोलनाची पायाभरणी महाराष्ट्रात झाली. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत महाराष्ट्राने मोठे योगदान दिले आहे, असे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने सुरु असलेले ‘व्यर्थ न हो बलिदान’ चलो बचाये संविधान’, हे अभियान आज नांदेडमध्ये संपन्न झाले. या कार्यक्रमात पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे व चंद्रकांत हंडोरे, माजीमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, संपतकुमार, प्रदेश सरचिटणीस व ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियानाचे समन्वयक विनायक देशमुख व अभय छाजेड, नांदेड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गोविंदराव नागेली आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ज्या लोकांचा स्वातंत्र्य चळवळीत कधीच सहभाग नव्हता त्यांनी धर्माच्या नावाखाली देश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जे देश धर्माच्या नावावर उभे राहिले तेथे लोकशाही नांदू शकली नाही. भारतही धर्माच्या नावावर उभा राहिला असता तर आपल्या देशातली आजची परिस्थिती वेगळी असती. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नाने लोकशाही व्यवस्था देशात निर्माण झाली म्हणून आपण आज हा दिवस पाहत आहोत. हे स्वातंत्र्य फक्त काँग्रेसच वाचवू शकते आणि धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. देशाच्या एकात्मतेला बाधा पोहचवणाऱ्यांविरोधात काँग्रेस उभा राहिल. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे काम काँग्रेसने केले आहे. चुकीच्या लोकांच्या हातात देश गेला तर काय होते ते आज पहात आहोत. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथूनच शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. लोकांनी भाजपाला भरघोस मतदान करुन सत्ता दिली पण सत्तेत येताच भाजपाने तो निवडणूक जुमला होता असे म्हटले. तर दुसरीकडे मात्र हेच मोदी सरकार उद्योगपतींची कर्जमाफ करत आहेत.
विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, आजचा दिवस हा देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्यांची आठवण करण्याचा दिवस आहे. त्यांच्या बलिदानामुळेच हा दिवस आपण पहात आहोत. पण सध्या देशातील परिस्थिती वेगळी आहे, सरकारच्या विरोधात बोलले तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो, ईडीची कारवाई केली जाते. ईडीचे नाव याआधी कधी फारसे चर्चेत नव्हते पण मागील काही वर्षात ईडी हे जास्त चर्चेत आले आहे. सध्या लोकशाही व राज्यघटनेला धोका आहे तो ओळखला पाहिजे. देशातील शेतकरी १० महिन्यापासून आंदोलन करत आहे त्याची साधी दखलसुद्धा केंद्रातील सरकार घेत नाही. कोरोना काळात हिंदूंची शेकडो प्रेते गंगा नदीपात्रात वाहत होती. जे लोक हिंदुचे नाव घेऊन मतं मागून सत्तेत आले त्यांच्याच राज्यात हिंदूंच्या प्रेतांची अवहेलना होते अशा लोकांना हिंदूंचे नाव घेण्याचा हक्क नाही.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात मोठी स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली, त्यातूनच पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाले. यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. त्या संघर्षाची, बलिदानाची आठवण करण्याची ही वेळ आहे. या स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचे नाही. अमृत महोत्सवी वर्षात हे वैभव जतन करायचे आहे. हे वैभव पुसून टाकण्याचे काम कोण करत असेल तर ते थोपवले पाहिजे. काँग्रेसचा अजेंडा हा विकासाचा, देशाचे संविधान वाचवण्याचा आहे परंतु संविधान व देशाचा इतिहास बदलण्याचे काम केले जात आहे त्या शक्तीचा बिमोड आपल्याला करायचा आहे. अहिंसेच्या मार्गाने जाणाऱ्या महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेच्या विचाराचे गुणगान काही लोक गात आहेत हे देशासाठी घातक आहे. देशात सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणली आहे. देशाच्या नागरिकांवर पाळत ठेवण्याचे काम, लोकशाहीच्या तत्वांना तिलांजली देण्याचे काम सुरु आहे. देशाच्या स्वातंत्र्यात भाग घेतलेला एकही नेता भाजपाकडे नाही, त्यांच्याकडे इतिहास नाही. वल्लभभाई पटेलांचा उंच पुतळा उभारून चालणार नाही त्यांच्या विचारांची उंची गाठता आली पाहिजे.
यावेळी स्वातंत्र्यसैनिकांचा व त्यांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला. नांदेडमधील कार्यक्रमाला लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या चार जिल्ह्याचे पदाधिकारीही उपस्थित होते.

Check Also

अखेर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अधिकार मंत्रिमंडळाकडेच मंत्रिस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत

अर्धन्यायीक प्रकरणे वगळता मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत. हे सर्व अधिकार पूर्वीप्रमाणेच …

Leave a Reply

Your email address will not be published.