Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंच्या आव्हानावर एकनाथ शिंदेंनी ट्विट केले ‘त्या’ आमदाराचे पत्र एकनाथ शिंदे, उध्दव ठाकरे यांच्यातील संघर्ष वाढीला

शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या आमदारांचे समर्थन वाढत असल्याने आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी आणि बंडखोर शिवसैनिकांशी संवाद साधताना म्हणाले, मी राजीनामा द्यायला तयार आहे. मी मुख्यमंत्री पदी रहायला नालायक आहे. तसेच पक्ष चालवायलाही मी लायक नाही हे मला समोर येवून सांगावे मी लगेच मुख्यमंत्री पदाबरोबर शिवसेना पक्षप्रमुख पदही सोडायला तयार आहे. फक्त मला समोर येवून कोणीही सांगावे असे सांगत बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आव्हानानंतर एकनाथ शिंदे काय उत्तर देतात याकडे लक्ष लागलेले असताना एकनाथ शिंदे यांनी आज आमदार संजय शिरसाट यांचे पत्रच ट्विट करत ‘या आहेत आमदारांच्या भावना’ उध्दव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलेले ते पत्र बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी लिहिले असून त्यात त्यांनी प्रामुख्याने उध्दव ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या विश्वासू सहकाऱ्यांवर टीका केली.

संजय शिरसाट यांनी काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्याच्या घटनेचा धागा पकडत आपल्या पत्रात म्हणाले की, काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती.

आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश कऱण्यासाठी आम्हाला तुमच्या आजुबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरवत होती. त्याचा निकाल काय लागला हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे, असा खोचक टीका त्यांनी उध्दव ठाकरे यांचे विश्वासू असलेल्या संजय राऊत आणि अनिल परब यांच्यावर केली.

तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे? असे म्हणते ते पुढे आपल्या पत्रात म्हणाले की, हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूचे बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही. किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचलीसुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला एकनाथ शिंदे यांचा दरवाजा उघडा होता. मतदारसंघात असलेली वाईट परिस्थिती, मतदारसंघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान, आमची सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही हा निर्णय घेण्यास घ्यायला लावला असेही त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली.

साहेब, जेव्हा आम्हाला वर्षावर प्रेवश मिळत नव्हता तेव्हा खरे विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते. मतदरासंघातली काम करत होते. निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते. भुमीपुजन आणि उद्घाटनं करत होते. तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो?, असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केला.

त्यांची काम कशी होतात? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर काय घ्यायचं या विचाराने जीव कासावीस व्हायचा,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं, माननीय बाळासाहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हिंदूत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते. आजही आहेत आणि उद्याही राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं असेही त्यांनी शेवटी सांगितले.

मतदारासंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्ही बोलावलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन उचलायचे नाहीत. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो, असा आरोपही त्यांनी केला.

हिंदुत्व, अयोध्या, राम मंदिर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असं सांगितले. मुंबई विमानतळावरुन अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते. आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करुन सांगितलं, की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वत: परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की सीएम साहेबांचा फोन आला होता. आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतलं आणि आपलं घर गाठलं. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हतं मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिले नाही?, अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली.

Check Also

भाजपाचे शरद पवार यांना प्रत्युत्तर,… संविधान बदलाच्या अफवा

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *