Breaking News

नाना पटोले म्हणाले, सावंतांच्या विधानावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा मराठा समाजावर गरळ ओकणाऱ्या सावंतांची तात्काळ हकालपट्टी करा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असताना शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’ सुटली आहे, असे अत्यंत आक्षेपार्ह व बेजबाबदार विधान केले आहे. तानाजी सावंत यांचे हे विधान मराठा समाजाची बदनामी करणारे व त्यांचा अपमान करणारे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंत यांच्या विधानावर खुलासा करावा व बेताल वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंत यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विधानाचा समाचार घेताना नाना पटोले पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातून विविध संघटना, राजकीय पक्ष यांचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारी पातळीवर व न्यायालयीन पातळीवरही हा लढा सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. २०१४ साली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. परंतु त्यानंतर आलेल्या फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षण संपुष्टात आले. आजही हा प्रश्न सुटावा व मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असताना राज्यातील एक मंत्री अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतो हे अत्यंत निषेधार्ह आहे.

तानाजी सावंत हे सातत्याने वादग्रस्त विधाने करून वातावरण बिघवण्याचे काम करत असतात. प्रसिद्धी माध्यमांबद्दलही त्यांनी नुकतेच वादग्रस्त विधान केले होते. या महोदयांनी याआधी महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा केली होती. तानाजी सावंत यांचे विधान सत्तेचा माज दाखवते, पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, सत्तेची मस्ती कशी उतरवायची हे त्यांना चांगले माहित आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी व शिंदे-फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *