आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार टीकविण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. मात्र उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आमच्यावर गद्दार, खोके म्हणून टीका करत आहेत. परंतु होय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला खोके दिले पण ते मिठाईचे खोके दिले. पण मी आणि आमदार योगेश कदम यांनी जे खोके मातोश्रीवर आणून दिले ते खोक्याचे काय केले असा सवाल करत आम्ही दिलेल्या त्या खोक्यातून तुम्ही तुमची उंची वाढविण्यासाठी वापरलात असा घणाघाती आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केला.
५ मार्चला ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची खेड येथे जाहिर सभा झाली. या सभेत उध्दव ठाकरे यांनी भाजपासह शिंदे गटाच्या आमदारांवर टीकेची झोड उठविली होती. त्यानंतर या सभेला याच मैदानावरून १९ मार्चला प्रत्युत्तर देणार असल्याची घोषणा रामदास कदम यांनी केली. तसेच ठाकरे यांच्या सभेपेक्षा जास्त गर्दी या सभेला असेल असे आव्हानही दिले.
त्यानुसार आज आयोजित करण्यात आलेल्या सभेला संबोधित करताना रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या आमदारांवर टीका केली.
यावेळी रामदास कदम म्हणाले, काही जण म्हणत होते जिसमे नही दम उसका नाम रामदास कदम. पण आज इथे जमलेली गर्दी उध्दव ठाकरे यांना दाखवा आणि त्यांना सांगा ही रामदास कदम आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असलेली ही शिवसैनिकांची ताकद आहे.
आदित्य ठाकरे हे लहानपणापासून खोक्याशी खेळत आहेत. त्यामुळे त्यांना सातत्याने खोकेच दिसत आहेत. त्यांना काय माहित आहे की या रामदास कदम आणि गजानन किर्तीकरांसारख्यांनी शिवसेनेच्या पडत्या काळात काय काम केले ते असा उपरोधिक टोलाही रामदास कदम यांनी लगावला.
रामदास कदम पुढे बोलताना म्हणाले, आम्हीही उध्दव ठाकरे यांना खोके पोहोचवले, त्याचे काय केले यांनी फक्त स्वतःची उंची वाढविण्यासाठी ते खोके वापरले. त्या खोक्यातून कुणी लंडन, सिंगापूर, श्रीलंका यासह अन्य देशात मोठे मोठे हॉटेल्स खरेदी केले असा सवाल करत याची माहिती एक ना एक दिवस बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही दिला.
भास्कर जाधव यांच्यावर टीका करताना रामदास कदम म्हणाले, ह्या रामदास कदमने भास्कर जाधवला शिवसेनेत आणला. त्याच्या निवडणूकीचा खर्च केला आणि आज उध्दव ठाकरे या भास्कर जाधव यांना जवळ केलेय. मला जाणीवपूर्वक गुहागरमधून उमेदवारी दिली. त्याचबरोबर मला चार वर्षापासून उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीवर भेट दिली नसल्याचे सांगत आता माझे आणि माझ्या मुलाचे राजकिय भविष्य संपविण्यासाठी प्रयत्न सुरु केलात. पण हा रामदास कदम आणि योगेश कदम यांना संपविणे इतके सोपे नसल्याचे सांगत आगामी निवडणूकीत भास्कर जाधवला गाडल्याशिवाय राहणार नाही असा निर्धारही व्यक्त केला.
यावेळी रामदास कदम यांनी जाहिर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाज मंदिरासाठी दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर करा अशी विनवणी करत आपण सगळ्यांना जसे खोके वाटले तसे आता आम्हालाही खोके मंजूर करा अशी मिश्किल विनंती केली.