Breaking News

विजय वडेट्टीवार यांची भूमिका, आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी बोलू अन्यथा… स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीवरून संजय राऊत यांच्या मतानंतर पुन्हा व्यक्त केली भूमिका

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुंबई ते महानगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याचा निर्णय शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जाहिर केला. त्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे नेते विजय वड्डेटीवार यांनीही यासंदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, कदाचित ते त्यांचे स्वतःचे मत असेल पण आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी बोलू असे सांगत अन्यथा आम्हीही स्वबळावर निवडणूकीला सामोरे जाण्याचा मार्ग आहे असेही यावेळी सांगितले.

यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, संजय राऊत यांचे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांना सामोरे जाण्याचा निर्णय कदाचित स्वतःचा असेल. मात्र यासंदर्भात आम्ही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलू विनंती करु असे सांगत त्यानंतरही त्यांची भूमिका हीच राहणार असेल तर आमच्यासमोरही स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा आहेच असेही यावेळी स्पष्ट केले.

विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीत आमच्यासोबत शरद पवार यांची राष्ट्रवादीही आहे. त्यामुळे यासंदर्भात त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. तसेही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमची काँग्रेसची मागील अनेक वर्षापासून आघाडी आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा जर स्वबळावर निवडणूकीला जाणार असेल तर आम्हीही आघाडी म्हणून निवडणूकीला सामोरे जाऊ असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, दिल्लीत इंडिया आघाडी धक्का नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो. काल माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. मी म्हटलं होतं की, संजय राऊत, नाना पटोले आणि आम्हीही त्यात होतो. २० दिवस जागा वाटपाच्या चर्चेत घालविले. चर्चा करत असताना चर्चेचे गुऱ्हाळ २० दिवस चालले. त्यामुळे आम्हाला धक्का बसला असे म्हणालो होतो. पण माझ्या वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं असेही यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *