लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढले. विधानसभेला मुंबईत काँग्रेसला जास्त जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती पण कमी जागा मिळाल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त संधी मिळावी अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे, या भावना पक्षश्रेष्ठींना कळवू व पक्षाचे वरिष्ठ नेते मुंबईपासून नागपूरपर्यंत कसे लढायचे याचा निर्णय घेतील, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो त्यात चुकीचे काहीच नाही. कोणी काय भूमिका घ्यावी हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे पण काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ नेत्यांना कळवणे हे आमचे काम आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्म पाळून सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाने प्रयत्न केला आहे. आघाडीमध्ये कोणताही निर्णय घेताना चर्चा करुन घेतला पाहिजे पण परस्पर कोणी निर्णय जाहीर करत असेल तर काँग्रेस पक्षही त्यांचा निर्णय घेईल. संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाचे मत मांडले तसेच काँग्रेस पक्षाचे मतही आम्ही मांडू. संजय राऊत यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही, असेही यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे हे शत्रू नाहीत या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, उद्धव ठाकरे शत्रू नाहीत तर मग त्यांचा पक्ष, चिन्ह दुसऱ्याला का दिले व त्याला राजाश्रयही दिला असा सवाल करत आता त्यांनी असे विधान केले आहे तर त्याचा काय अर्थ आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने व एकनाथ शिंदे यांनी पहावे. भाजपाने महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ केल्याचा आरोपही यावेळी केला.