Breaking News

वर्षा गायकवाड यांची टीका, ८० कोटी लोकांना मोफत धान्य, भाजपा सरकारने कोणाचा विकास केला? मागील ११ वर्षात देशात गरिब व श्रीमंत दरी वाढली; भाजपा सरकारचा विकास फक्त मुठभर श्रीमंतांसाठी

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देशात ८० कोटी तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ७६.३२% आणि शहरी भागात ४५.३४% लोकसंख्या लाभार्थी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गरिब लोक आहेत तर मग ११ वर्षात कोणाचा विकास झाला? असा प्रश्न उपस्थित करत भाजपा सरकारच्या काळात फक्त मुठभर लोकांचा विकास झाला असून बहुसंख्य जनता ही गरिबीचे जीवन जगत आहे, विकासाच्या फक्त गप्पा मारल्या जात आहेत, अशी टीका यावेळी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.

लोकसभेत खासदार प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्न क्रमांक १९४ अंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिलेल्या उत्तरानुसार महाराष्ट्रातील सुमारे ७००.१७ लाख व्यक्तींना या योजने अंतर्गत मोफत धान्याचा लाभ मिळत आहे. यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत जानेवारी २०२५ मध्ये ३ लाख ८३ हजार ७६६ टन धान्य वाटप करण्यात आले असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ७६.३२% आणि शहरी भागात ४५.३४% लोकसंख्या या योजनेंतर्गत समाविष्ट आहे. अंत्योदय अन्न योजना  आणि प्राधान्य घराणीसाठी रेशन कार्ड Ration Cards वितरित, यामध्ये एससी एसटी आणइ ओबीसी SC/ST/OBC कुटुंबांचाही समावेश आहे. तर देशभरात ८१.३५ कोटी लाभार्थ्यांपैकी ८०.५६ कोटी नागरिकांना मोफत धान्य मिळत आहे.

सरकारची आकडेवारी पाहता केंद्र सरकारच्या विकासाचे मोठे दावे फोल ठरत आहेत. ८० टक्के जनतेला ५ किलो मोफत धान्य द्यावे लागत असेल तर विकास गेला कुठे, मुठभर लोकांचा विकास म्हणजे सर्व समाज घटकांचा विकास नाही. सरकारची आकडेवारीच सांगते आजही बहुसंख्य लोक गरिबीत जीवन जगत आहेत. २०१४ पासून देशात गरिब व श्रीमंत यांच्यातील दरी वाढत असल्याचे ही आकडेवारीच सांगत असून ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे, असे खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *