Breaking News

वर्षा गायकवाड यांचे आवाहन, ‘शक्ती अभियानात सहभागी व्हा राजकारणात महिलांना समान संधी देण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न

राजकारणात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे यासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने प्रयत्न केला आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी घेतला. महिलांच्या बाबतीत ‘आधी आबादी, पुरा हक’ हा काँग्रेसचा नारा असून राजकारणात आणि शासनाच्या सर्व स्तरांवर ‘महिला प्रतिनिधित्व’ वाढावे यासाठी काँग्रेस पक्षाने आता ‘शक्ती अभियान’ सुरु केले आहे. या अभियानात जास्तीत जास्त महिलांनी भाग घ्यावा, असे आवाहन मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केले.

राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राजकारणात महिलांचा आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाने ‘इंदिरा फेलोशिप’ सुरू करण्यात केली असून आज हा उपक्रम महिला नेतृत्वासाठी एक सशक्त चळवळ बनला आहे. इंदिरा फेलोशिप हा शक्ती अभियानाचा एक अविभाज्य भाग आहे. राजकारणात महिलांचा आवाज मजबूत करण्यासाठी आणि समाजात आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सन्मानार्थ हा उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. या उपक्रमात एका वर्षाच्या कालावधीत २८ राज्ये आणि ३०० तालुक्यांमध्ये ३१ हजार सदस्यांसह ४,३०० शक्ती क्लब स्थापन केले आहेत. महिलांनी शक्ती अभियानात सहभागी होऊन काँग्रेस संघटन मजबूत करण्यासाठी योगदान द्यावे. या अभियानात सहभागी होण्यासाठी https://www.shaktabhiyan.in वर नोंदणी करा आणि ८८६०७१२३४५ वर मिस कॉल द्या, असेही सांगितले.

पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष फक्त घोषणा करत नाही तर त्याची अंमलबजावणीही करते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली ४० टक्के महिलांना उमेदवारी दिली होती. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून माझ्यासह, प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांना पक्षाने संधी दिली व आज आम्ही देशाच्या संसदेत एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून आवाज उठवत आहोत. देशाला पहिली महिला पंतप्रधान, पहिली महिला राष्ट्रपती, लोकसभेच्या अध्यक्षपदाचा मानही काँग्रेस पक्षानेच दिला आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महिला आरक्षण मंजूर करुन घेतले पण त्याची अद्याप अंमलबजावणी केली नाही व कधी होईल हेही सांगता येत नाही. समाज आणि राजकारणात बदल घडवून आणायचा असेल तर महिलांनी शक्ती अभियानात सहभागी व्हावे, असेही यावेळी सांगितले.

या पत्रकार परिषदेत ॲड. संदिप पाटील, अखिलेश यादव, प्रवक्ते युवराज मोहिते, प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस, तुषार गायकवाड, गौरी छाबरिया, फ्रीडा निकोलस, आयेशा अस्लम खान, रोहिणी धोत्रे, दिपक तलवार , सुरभी व्दिवेदी इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *