Breaking News

वंचितप्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान मोदी काहीच चुकीचे वागत नाहीत उध्दव ठाकरे यांच्याशी युती केल्यानंतरही मोदींचे समर्थन

एकाबाजूला वंचित बहुजन आघाडी आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने देशातील लोकशाही आणि राज्यघटना वाचविण्यासाठी एकत्र येत असल्याचे जाहिर करत नुकतीच वंचित आणि शिवसेनेने युती केली. या युतीच्या घोषणेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आज चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चुकीचे वागत नसल्याचे जाहिर वक्तव्य करत महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या भूमिकेला छेद देण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काहीही चुकीचं वागत नाहीत. एवढंच काय मी त्यांच्या जागी असतो तरीही असंच वागलो असतो. कायद्याच्या चौकटीत राहून जे करायचं तेच मोदी करत आहेत. मी नरेंद्र मोदींच्या जागी असतो तरीही हेच केलं असतं असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीबीआय, आयकर विभाग, ईडी यांचा गैरवापर करत आहेत असं मला वाटत नाही. ते जे काही करत आहेत ते कायद्याच्या चौकटीत राहून करत आहेत. सत्ता राखण्यासाठी त्यांना जे आवश्यक आहे ते सगळं पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. त्यांच्या जागी मी असतो, म्हणजेच जर मी नरेंद्र मोदी असतो तर मी देखील हेच केलं असतं जे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची खुर्ची हवीच आहे. कायदेशीर मार्गाने ती वाचवणं यात काहीही चुकीचं नाही. याआधीच्या सरकारांमध्येही अशा प्रकारच्या कारवाया झाल्या आहेत. कुणीही सत्ता राखण्यासाठी तेच करतं जे आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत असे स्पष्टीकरणही आंबेडकर यांनी दिले.

सामान्य माणसांनी एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की २०१२ पासून काही षडयंत्रं सुरू आहेत. पक्षांमध्ये भांडणं लावली जात आहेत असं माझं निरीक्षण आहे. एक लक्षात घ्या माणसाचा भरवसा नसतो. भाजपा किंवा संघाने या प्रश्नाचं उत्तर द्यावं. माझी इच्छा नाही की असं व्हावं पण उदाहरण म्हणून घ्या की उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या काही झालं? तर पुढचा पंतप्रधान कोण असेल हे सांगतील का? त्यांना सांगता येणार नाही. अशात आमच्याकडे विचाराल की पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? आमच्याकडेही कुणालाही सांगता येणार नाही असेही ते म्हणाले.

मला उद्या भाजपासोबत जाण्याचा मोह झाला तर मी जाऊ शकतो. एक तर माझा पक्ष मला अडवू शकतो किंवा माझे कुटुंबीय मला अडवू शकतात. तिसरी अशी कुणीच व्यक्ती नाही असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

एक लक्षात घ्या भाजपाला ती प्रत्येक संधी हवी आहे ज्या ठिकाणी त्यांना फूट पाडता येईल. भाजपाकडून जे काही केलं जातं आहे ते काही चुकीचं नाही. राजकीय खेळाचा तो एक भाग आहे. मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. मी पाहात आलो आहे की सत्ता आली की सत्तेवर येणारा पक्ष असंच वागत असतो. राजकारणात किंतू-परंतू यांना काहीही अर्थ नसतो असे सांगत विरोधक एकत्र आले तर ते खुर्चीखाली आग लावतील हे सत्य आहे. मग पंतप्रधान म्हणून मी हे का करू देऊ? विरोधकांना दूर ठेवण्याचा त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न मोदींकडून केला जातो आहे. मला यात काहीही चुकीचं वाटत नाही असे सांगत मोदी आणि भाजपाच्या राजकारणाचे प्रकाश आंबेडकर यांनी समर्थन केले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *