मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधी अवादा कंपनीला खंडणीसाठी फोनवरून दिलेल्या धमकीच्या दिवशीच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आणि खंडणी प्रकरणातील आरोपींचा एक सीसीटीव्ही फुटेज बाहेर आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयात चालल्याचे दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे सीसीटीव्ही फुटेज ज्या दिवशी अवाधा कंपनीकडे २ कोटीची खंडणी वाल्मिक कराडने फोनवरून मागितली. त्याच दिवशीचा असल्याचेही सांगण्यात येत आहे. देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिकी कराडच्या आधी इतर पाच जणांवर यापूर्वीच मकोका कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तर वाल्मिक कराड याच्यावर नुकताच दाखल करण्यात आला.
व्हायरल फुटेज हे २९ नोव्हेंबर रोजीचे असून या सीसीटीव्ही फुजेजमध्ये विष्णू चाटे याच्या केज कार्यालयाबाहेरील असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी वाल्मिक कराड याच्यासह संतोष देशमुख यांची हत्या करणारे प्रतिक घुले, सुदर्शन घुले आणि त्याचे मित्र दिसून येत आहेत. त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयातीत भूमिकेत राहिलेली निलंबित पीएसआय राजेश पाटील हे देखील वाल्मिक कराडला भेटल्याचे याच दिसून येत आहे.
हे फुटेज व्हायरल झाल्यानंतर वाल्मिक कराड हा खंडणी मागण्यासाठीच आला होता अशी चर्चा रंगली असून राजेश पाटील विष्णू चाटेला हॉटेलमध्ये भेटल्याचा दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या व्हिडिओमध्येही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सहभागी वाल्मिक कराडच्या गँगसह राजेश पाटील दिसून आल्याने यातील गुंतागुंत वाढताना दिसून येत आहे. अवादा कंपनीकडे ज्या दिवशी विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली त्यावेळी राजेश पाटील वाल्मिक कराडला का भेटला असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
या व्हायरल फुटेजमुळे वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच वाल्मिक कराडच्यावतीने विष्णू चाटे यांने अवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती. अवादा कंपनीने खंडणीप्रकरणी नकार दिल्यानंतर विष्णू चाटे हा त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर अवाधा कंपनीत गेला होता. त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षकाशी वाद झाला होता. ज्या सुरक्षा रक्षकाशी वाद झाला तो संतोष देशमुख यांच्या गावचा होता. त्यामुळे संतोष देशमुख हे अवादा कंपनीत गेले त्यावेळी विष्णू चाटे याच्याशी संतोष देशमुख यांच्याशी वाद झाला होता. त्यातूनच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घुण हत्या करण्यात आली.