Breaking News

एकनाथ शिंदे ‘या’ २० आमदारांना घेवून सूरतमध्ये, शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र शिंदेमुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी अडचणीत

शिवसेनेतील नंबर २ चे नेते म्हणून ओळखले जाणारे आणि ठाण्याचे सर्वेसर्वा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या जवळपास २० आमदार घेवून गुजरातमधील सूरत गाठल्याची माहिती पुढे आल्याने महाविकास आघाडी सरकारबरोबर शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अडचणीत आणल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

काल दिवसभर विधान परिषदेसाठी मतदान पार पाडल्यानंतर एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांना घेवून ठाणे येथे गेले आणि त्यानंतर तेथून ते पालघर मार्गे सूरतच्या दिशेने गेल्याचे सांगण्यात येत आहे. विधान परिषदेचा निकाला जाहिर झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. त्याचा निरोप देण्यासाठी वर्षा निवासस्थानावरून फोना फोनी सुरु झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार नॉट रिचेबल असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे शिवसेनेत एकच हल्लकल्लोळ उडाला.

याबाबतची नेमकी माहिती पुढे यायला सकाळ उजाडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या उघड  बंडाबाबतची माहिती पुढे आली. त्यानंतर कोणकोणते आमदार नॉट रिचेबल आहेत याची माहिती घेण्यास सुरुवात झाली असता सुरुवातीला १० ते १२ आमदार नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात येवू लागले. त्यानंतर या संख्येत आणखी वाढ होत ही संख्या ३५ असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांच्यासोबत २० आमदार असल्याची माहिती पुढे येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे २० आमदार नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात समजल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांना दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते वर्षा या निवासस्थानी पोहोचले. तेथे या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात चर्चा झाली.

यानंतर एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु झाले. मात्र प्रत्यक्षात त्यांच्याशी बऱ्याच उशीराने संपर्क झाल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगत एकनाथ शिंदे यांनी चर्चेची तयारी दर्शविली असून त्यांच्यासोबत चर्चेला शिवसेनेकडून काही जण जाणार असल्याचे सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले आमदार कोण माहित आहे का?  

बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्रीनिवास वणगा (पालघर), विश्वसनाथ भोईर, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, रेमेश बोरनारे, बालाजी कल्याणकरन (नांदेड), प्रकाश आबीटकर (कोल्हापूर), शांताराम मोरे, सुहास कांदे (नाशिक), नितीन देशमुख, शंभूराज देसाई (पाटण), अब्दुल सत्तार (सिल्लोड), संदीपान भुमरे, महेंद्र दळवी, भरत गोगावले (महाड), अनिल बाबर, किशोर अप्पा पाटील, संजय शिरसाट, प्रकाश सुर्वे (मागाठाणे) हे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *