गुढी पाडव्याच्या निमित्ताने मनसेच्या आयोजित मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपाच्या प्रचाराच्या मुद्यांवर आधारीत भाषण करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले. त्याचे पडसाद काल रविवारी मोठ्या प्रमाणावर उमटल्यानंतर रात्रो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले तसेच या दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी महत्वपूर्ण वक्तव्य करत तरीही मनसेबरोबरची युती शक्य नसल्याचे मत व्यक्त केले.
राज ठाकरे जोपर्यंत परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तोपर्यंत युती शक्य नाही अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली. आधी केवळ आम्हालाच वाटत होते की शिवसेनेने हिंदुत्व सोडले, पण राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणाचा अंदाज घेतला तर आता घरातूनच आवाज उठायला लागला आहे. राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने चालले आहेत. माझी आणि राज ठाकरे यांची लवकरच भेट होणार आहे. पण ती वेगळ्या विषयावर होणार असून ही भेट राजकीय असणार नसल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, राज्यातील मंत्र्यांवर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवरही रावसाहेब दानवे म्हणाले की, ईडी, सीबीआय या स्वायत्त संस्था आहेत. तक्रार आल्यावरच त्या कारवाई करतात. त्यामुळे तक्रार असेल तर कोणावरही कारवाई होऊ शकते, त्यात घाबरण्याचे कारण काय? असा सवाल केला.
तर, राज ठाकरे जोपर्यंत परप्रांतियांबाबत त्यांची भूमिका बदलणार नाहीत, तोपर्यंत भाजपा मनसेची युती होणार नाही, हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.
मात्र यार परपांत्रीयांच्या मुद्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची दोन वेळा बैठक होत त्यावर चर्चाही झालेली आहे. त्याचबरोबर याच मुद्याच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची एकदा भेट झालेली आहे.
