केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जितके खवय्ये म्हणून प्रसिध्द आहेत. तितकेच राजकारणाच्या पलिकडे जावून मैत्री जपणारे नेते म्हणूनही ते परिचीत आहेत. मात्र आज त्यांनी चक्क काँग्रेस नेत्यांनाच पक्ष सोडून न जाण्याची विनंती करत पक्ष मजबूत करण्याचा सल्लाही दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.
एका प्रसार माध्यमाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळई केलेल्या भाषणा दरम्यान काँग्रेस नेत्यांना ही सूचना केली.
पराभवानंतर निराश होऊ नका आणि पक्षासोबत राहून काम करा. काँग्रेस मजबूत राहावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. जे काँग्रेसच्या विचारसरणीचे पालन करतात, त्यांनी पक्षासोबत राहून खंबीर राहावे. पराभवाने खचून न जाता त्यांनी काम करत राहावे. पराभव झाला तर एक दिवस विजयही होणारच असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त करत काँग्रेस नेत्यांना हिंमत दिली.
भाजपाला संसदेत फक्त २ जागा जिंकता आल्याची आठवणही सांगितली. ते म्हणाले, पण कार्यकर्त्यांच्या मेहनतीने काळ बदलला आणि अटलबिहारी वाजपेयींच्या रूपाने आम्हाला पंतप्रधान मिळाला. अशा परिस्थितीत निराश होऊन आपली विचारधारा सोडू नये असे आवाहनही त्यांनी काँग्रेस नेत्यांना केले.
लोकशाहीसाठी काँग्रेस पक्ष मजबूत असणे आवश्यक आहे. सलग निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि पक्षाचे नेते निराश होऊन पक्ष सोडू नयेत, हीच आपली इच्छा आहे. काँग्रेस पक्ष कमकुवत होत असून देशातील मुख्य विरोधी पक्षाची जागा प्रादेशिक पक्ष घेत आहेत, हे चांगले लक्षण नसल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
लोकशाही दोन चाकांवर चालते- सत्ताधारी आणि विरोधक. प्रबळ विरोधी पक्ष ही लोकशाहीची गरज आहे, त्यामुळे काँग्रेस मजबूत असावी अशी माझी इच्छा आहे. त्याचवेळी काँग्रेस कमकुवत असताना त्याचे स्थान प्रादेशिक पक्ष घेत आहेत, जे लोकशाहीसाठी चांगले नाही. त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षाची जागा घेण्यासाठी मजबूत झाला पाहिजे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
