Breaking News

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, सत्तामेव जयते, पाशवी बहुमत मिळूनही काहीजण शेतात… सामाजिक कार्यकर्त्ये डॉ बाबा आढाव यांचे आत्मक्लेश आंदोलन मागे

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत संशयातीत बहुमत महायुतीतील घटक पक्षांना मिळाले. मात्र या निवडणूकीत ईव्हीएम मशिन्सचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच यासंदर्भात लोकांमध्येही चर्चा सुरु आहे. यापार्श्वभूमीवर कालपासून ईव्हीएम मशिनच्या विरोधात आणि देशातील लोकशाही प्रणाली वाचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्ये डॉ बाबा आढाव यांनी आत्मक्लेश उपोषणाचे आंदोलन सुरु केले. या आंदोलनास सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पाठिंबा दिला. त्यानंतर दुपारनंतर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनास भेट देत पाठिंबा दिला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन आत्मक्लेश आंदोलन थांबवले.

यावेळी बोलताना शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत कोणी वडीलधारी व्यक्ती नाही की, जे करतोयस ते बरोबर करतोस ते सांगण्यासाठी. बाबा आढाव यांच्या निमित्ताने ती कमतरता भरून निघाली आहे. त्यांनी या वयातही जी भूमिका घेतली ती खरोखरचं स्विकारार्य आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार होते. त्यावेळी विधानसभेची मुदत संपली म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मात्र आता विधानसभेची मुदत संपून गेली तरी राज्यात राष्ट्रपती राजवट अद्याप का लागू करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित होत असल्याचा खोचक सवाल यावेळी केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात विधानसभा निवडणूका झाल्या की, बहुमत मिळवणारे सर्वात आधी राज्यपालांकडे जातात. मात्र या निवडणूकीत पाशवी बहुमत मिळल्यानंतरही काही जण अमावस्येचे कारण पुढे करत शेतात जातात अशी उपरोधिक टीका एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली. असं काय झालं की पाशवी बहुमत मिळाल्यानंतरही काहीजणांना राजभवनावर न जाता त्यांना शेतात जाण्याची पाळी येते असा खोचक सवालही यावेळी केला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, पूर्वी आणि आताही आम्ही म्हणायचो की, सत्यमेव जयते. पण आताच्यांना (भाजपाला) फक्त सत्तामेव जयते असेच दिसून येत आहे. त्याचा एक अंक आपण नाला सोपऱ्यात विनोद तावडे यांच्या निमित्ताने आपण पाहिला असल्याचे सांगत आताची परिस्थिती काही वेगळी नसल्याचे सांगत टीका केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बाबांचे आर्शिवाद घेण्यासाठी बरेच दिवस मनात होतं. त्यानुसार आज तो दिवस उजाडला. बाबा आजही आम्हाला तुमच्याकडून प्रेरणा मिळते. त्यामुळे प्रेरणा कधी म्हातारी होत नाही. मात्र निवडणूकानंतर मात्र विजयी झालेल्यांनाही कळेना की आपण विजयी कसे झाला आणि आमच्यासारखे पराभूत झालेलांनाही कळेना की आपण पराभूत कसे झालो. त्यामुळे सध्या विजयी झालेले आणि पराभूत झालेले दोघेही सारख्याच मनस्थितीत तुमच्याकडे येताना आणि जाताना दिसत आहे असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

मतदानाच्या वाढीवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील निवडणूकी दरम्यान शेवटच्या काही तासात इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. राज्यातील एकाही मतदान केंद्रावर लोकांच्या रांगा लागल्याचा फोटो किंवा व्हिडिओ पुढे आलेला नसताना इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान झालंच कसं असा सवालही यावेळी उपस्थित करत पुढे म्हणाले की, विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे पती परकला प्रभाकर यांनी शेवटच्या काही तासात जे मतदान झालं त्याची आकडेवारी सांगितली. मात्र कोणताही फोटो किंवा मतदारांच्या रांगा लागल्याचा फोटो-व्हिडीओ आलेला नसताना हे मतदान झालं कसं असा सवालही यावेळी केला.

त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदानाची फेरतपासणीची मागणी केलेली असतानाही निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. त्यामुळे हे मतदान कशाने झालं असेल याविषयी संशय आहे. त्यामुळे माहिती अधिकारातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता इथे उपस्थित जयंत पाटील ही उपस्थित असून ती माहिती पुढे आणली गेली पाहिजे असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सूचना केली.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेकांना वाटेल की बाबा आढाव यांनी आंदोलन केलं पुढं काय. त्यांनी जो पुकारलेला लढा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर पेटला पाहिजे. वणवा पेटायला एका ठिणगीची आवश्यकता आहे. ती ठिणगी आता पडली आहे. त्यामुळे ईव्हिएमच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटला पाहिजे. संसदेतही महाविकास आघाडीचे खासदार यासंदर्भात आवाज उठवतील आणि हा वणवा संपूर्ण देशभरात पसरला पाहिजे अशी आशा व्यक्त करत या वयातही बाबा आढाव यांनी आंदोलन पुकारले. त्यामुळे वयाचा विचार करता बाबा आढाव यांनी स्वतःला करून घेत असलेला आत्मक्लेश आता थांबवावा आणि आपले आंदोलन मागे घ्यावे यासाठी त्यांना विनंती नाही तर हट्ट धरतो असे सांगत पाणी देऊन डॉ बाबा आढाव यांचे आत्मक्लेश आंदोलन थांबविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *