Breaking News

उदयनराजे भोसले म्हणाले, राज्यपालांची हकालपट्टी का झाली नाही याचे उत्तर भाजपाने द्यावे

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी आज किल्ले रायगडावर उदयनराजे यांनी निर्धार शिवसन्मानाचा या कार्यक्रमास उपस्थिती लावली. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अवमान करणारे वक्तव्य करूनही त्यांची हकालपट्टी का केली नाही याचे उत्तर भाजपाने राज्यातील जनतेला द्यावे अशी मागणी केली.
तसेच, भाजपाचं नाव न घेता पक्षाच्या काही नेतेमंडळींना लक्ष्य केलं.

उदयनराजे भोसलेंनी राज्यपालांना लक्ष्य करताना त्यांच्या हकालपट्टीची मागणी करत ते पुढे म्हणाले, राज्यपालांची हकालपट्टी झाली पाहिजे. राज्यपालांची हकालपट्टी नाही झाली, तर लोकांना भाजपानं उत्तर दिलं पाहिजे की का हकालपट्टी झाली नाही. त्यासाठीच आम्ही आझाद मैदानावर जाणार आहोत, यावेळी जाहिर केले.

शिवाजी महाराजांनी स्वत: सर्वधर्मसमभावाचा विचार मांडला, त्याच विकृतीकरण होतंय. मी कोणत्याही पक्षाचं समर्थन करत नाही. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो, तेव्हा तुम्ही ठामपणे भूमिका का घेत नाही की हे चुकीचं आहे. राज्यपालांना हटवलंच पाहिजे. राष्ट्रपती देशाचं सर्वोच्च पद आहे, राज्याचं सर्वोच्च पद राज्यपाल आहे. त्यांनीच अपमान केला असेल, तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले.

राज्यपालांचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावणार का? यासंदर्भात विचारणा केली असता उदयनराजे भोसलेंनी आक्रमक भूमिका घेणार असल्याचं सांगत, आम्ही जे काय करायचं ते करतो. काळी फीत लावून वगैरे काही होत नाही. त्यांची उचलबांगडी व्हायलाच हवी. ते इथे जर असते, तर त्यांचा टकमक टोकावरून कडेलोट झाला असता. त्यावर तुम्ही कडेलोट केला असता का? असा प्रश्न विचारताच उदयनराजे म्हणाले, त्यांचा तोल गेला असता. मी कशाला त्यांना हात लावतोय. मी त्यांना हात लावला, तर मला कमीपणा येईल असे सांगत सावध भूमिका मांडली.

काय वेळ आलीये? महाराजांचा जयघोष करण्यासाठी आलो असतो, तर वेगळा आनंद झाला असता. पण आपण काय करतोय? शिवसन्मानाचा निर्धार करण्याची वेळ आपल्यावर आलीये. या लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत की वैयक्तिक स्वार्थासाठी लोकांच्या विचारात तुम्ही बदल केला. शिवाजी महाराजांचा आपण सन्मान करायला हवा हे बोलावं लागतं. ही बोलायची गरज आहे? ते अंतकरणातून आलं पाहिजे, अशी भावनाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

लवकरच एक तारीख ठरवून आपण सगळ्यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात जायचंय. आजचा दिवस इतिहासात लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. कारण आज आपण आपल्या सगळ्यांची अस्मिता असणाऱ्या शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्यासाठी एक निर्धार केला आहे. आज आपण सगळे इतिहासाचा भाग झालो आहोत. कुठल्याही प्रकारे यात राजकारण येऊ देऊ नका. यामागे कुणाचाच स्वार्थ नाही. शिवाजी महाराजांचा अवमान यापुढे कुणी करूनच दाखवावा. काय होईल, ते आपल्या परीने आपण बघूनच घेऊ, असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आज शिवाजी महाराजांचाच अनादर महाराष्ट्रात होतोय. त्यांची विटंबना होतेय. चित्रपट असेल, लिखाण असेल, वक्तव्य असेल..आपण सगळे ते शांतपणे ऐकून घेतलं. काहीजण त्यातून सोयीनुसार अर्थ काढून घेत असतात. काहीजण त्याचं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समर्थन करण्याचं धाडस दाखवतात. कुणालाही महाराजांचा अवमान करण्याचा अधिकार नाही. असा वक्तव्यांना दुजोरा दिला जातो आणि आपण सगळे मूग गिळून पाहात बसतो. आजवर हीच सगळ्यात मोठी आपल्या सगळ्यांची चूक झाली. प्रतिक्रिया देत देत आता आपण सगळे प्रतिक्रियावादी झालो आहोत. हे सगळं आपल्या अंगवळणी पडलंय. हे या देशाला घातक आहे, असेही ते म्हणाले.

राज्यपालांच्या वक्तव्यावर टीका करतानाच उदयनराजे भोसले यांनी भाजपाच्या नेते मंडळींवरही टीकास्र सोडलं. जसं या देशाचं राष्ट्रपती हे सर्वोच्च पद आहे. तसं राज्यात राज्यपाल हे सर्वोच्च पद आहे. या लोकांच्या अंगवळणी पडलंय. या विकृतीमुळे सगळ्यांनी गृहीत धरलं की काही होणार नाही. ही राजकीय मंडळी स्वत:च्या स्वार्थासाठी त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतात. लाज वाटली पाहिजे. मला राज्यपालांचं नाव घेऊन त्याला मोठं करायचं नाहीये. ते पद महत्त्वाचं आहे, अशा शब्दांत उदयनराजे भोसलेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

आपलं मन व्यथित झालंय. पण फक्त व्यथित राहून चालणार नाही. जसं तेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, त्याचप्रकारे पुन्हा एकदा सगळ्यांनी महाराष्ट्रात जाऊन बांधणी करायची आहे. त्यासाठी तुम्ही सगळे सज्ज राहा असे आवाहन करत लवकरच एक तारीख ठरवून आपण सगळ्यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात जायचंय असे आवाहन करत राज्य सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांना इशाराही दिला.

Check Also

राजस्थानात नरेंद्र मोदींचे हेट स्पीच; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे १७ तक्रारी मुस्लिम देशातील घुसखोर, हिंदूची मालमत्तेचे पुन्हा वाटप करण्याचा प्रयत्न

देशातील लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार चांगलाच शिगेला पोहोचत आहे. यापूर्वी केंद्रिय निवडणूक आयोगाने लेव्हल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *