Breaking News

एकनाथ शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर, आपटी बार, फुसका बारच्या थयथयाटाला मी उत्तर देणार नाही… यांच्याकडे फक्त तीनच शब्द खोके, गद्दार आणि विकलेले गेलेले

बाळासाहेब ठाकरेंच्या विचार वाचविण्यासाठी आम्ही त्यांच्या नेतृत्वाविरोधात आम्ही उठाव केला. ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला बाळासाहेबांनी विरोध केला. त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसण्यासाठी आणि मुख्यमंत्री पदाच्या लालसेतून तुम्ही बंड केलात. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचे तुम्ही खरे गद्दारी केलीत. फक्त आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी शिवसेना वाचविण्याचे काम करत त्यांच्या तावडीतून आणल्याचा प्रत्यारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर करत त्यांच्या भाषणात फक्त गद्दार, खोके आणि मिंदे असे तीनच शब्द असतात. त्यामुळे जागा बदलली तरी त्यांचा तोच थयथयाट असतो. तसेच काही दिवसांपूर्वी आपटी बार आणि फुसका बार हा याच मैदानावर झाल्याचे सांगत त्यांच्या थयथयाटाला मी उत्तर देणार नसल्याचे सांगत उध्दव ठाकरे यांना अनुलेखाने मारण्याचा प्रयत्न केला.

५ मार्च रोजी खेड येथील गोळीबार मैदानावर आयोजित उध्दव ठाकरे यांच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी त्याच मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे बोलत होते.

यावेळी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, स्वा.वि.दा. सावरकर हे आमचे दैवत त्यांच्या विरोधात काँग्रेस मणिशंकर अय्यर यांनी अवमानकारक टीका केली. त्यावेळी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी चपलाने मणिशंकर अय्यरला मारले. मात्र आता मुख्यमंत्री पदासाठी उध्दव ठाकरे हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या काँग्रेससोबत गेले आहेत. राहुल गांधी हे सातत्याने सावरकर यांच्या विरोधात बोलत असतात मात्र उध्दव ठाकरे एका चकार शब्दानेही बोलत नाही हेच तुमचे हिंदूत्व असा सवालही केला.

यावेळी एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले, शिवसेनेसाठी तुम्ही गुन्हे अंगावर घेतले असा आव्हानात्मक सवाल करत म्हणाले माझ्या अंगावर एक नाही दोन नाही तर तब्बल १०९ गुन्हे दाखल आहेत. मात्र यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. सत्तातंरानंतर हे कधी झोपतात, कधी उठतात, यांचा सगळा वेळ दिल्ली वाऱीतच चालला असल्याची टीका त्यांनी केली. पण मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी लोकांमध्ये जातो, मिसळतो त्यांची कामे करतो असे सांगत पण तुम्ही तर घरात बसून राज्य चालविण्याचा प्रयत्न केलात. मला दोन वेळा कोरोना झाला पण मी मागे हटलो नाही. लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सतत बाहेर पडायचो. परंतु तुम्हाला तर घराबाहेर पडवेसे वाटले नाही असा खोचक टोलाही लगावला.

त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या घराचे दरवाजे उघडे असल्याच्या वक्तव्यावरून टीका साधताना म्हणाले, सगळे चालले तरी हे म्हणतात माझ्या घराचे दरवाजे उघडे आहेत. सगळे जातील फक्त तुम्ही दोघेच राहाल हम दो हमारे दो माझे कुटुंब माझी जबाबदारी असे म्हणत बसा असा उपरोधिक टोलाही ठाकरे यांना लगावला.

आमच्यावर सातत्याने ते गद्दार म्हणून टीका करतात पण आम्ही गद्दार नाही तर खुद्दार आहोत असे एकनाथ शिंदे यांनी सांगत छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचा इतिहास आहे, महादजी शिंदे, दत्ताजी शिंदे यांनी कधीही गद्दारीही केली नाही. एकवेळ प्राण दिला पण गद्दारी केली नाही. अरे गद्दारी आमच्या रक्तात नाही असे प्रत्युत्तरही उध्दव ठाकरे यांना दिले.

उध्दव ठाकरे हे सातत्याने म्हणतात आमच्या बापाचे नाव कशाला चोरता. होय बाळासाहेब ठाकरे हे तुमचेच वडील आहेत. साऱ्या जगाला माहित आहे. मात्र त्यांच्या विचारांचा वारसा आम्ही चालवत आहोत असे सांगत तुमच्याकडे फक्त त्यांच्या संपत्तीचा वारसा असेल पण त्यांच्या विचारांचा वारसा आमच्याकडे असल्याचे निवडणूक आयोगानेच शिवसेना आणि धनुष्यबाण देत दाखवून दिले आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार हिच आमची संपत्ती असा खोचक टोलाही शिंदेंनी ठाकरे यांना लगावला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *