Breaking News

काँग्रेसची मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव समिती स्थापन तर निवडणूकीची या नेत्यांवर जबाबदारी प्रदेश काँग्रेसकडून मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समितीची स्थापना

मराठवाडा मुक्ती संग्रामचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून या लढ्यातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी तसेच या लढ्याच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यासाठी प्रदेश काँग्रेसने मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समिती गठीत केली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील गौरव समिती मराठवाड्यातील सर्व विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.
या गौरव समितीत अध्यक्ष अशोक चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री बसवराज पाटील, माजी मंत्री अमित देशमुख यांच्यासह २७ सदस्य आहेत.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला तरी निजामाच्या अधिपत्याखालील मराठवाडा तसेच चंद्रपूर व सोलापूर जिल्ह्याच्या काही भागांसह संपूर्ण हैद्राबाद संस्थान पारतंत्र्यातच होते. निजामाने स्वतंत्र भारतात सामिल होण्यास नकार दिल्याने थोर गांधीवादी नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैद्राबाद मुक्तिसंग्राम सुरू करण्यात आला. या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी बलिदान दिले, अत्याचार सहन केला. अखेर भारत सरकारने हैद्राबाद संस्थानामध्ये पोलीस कारवाईला सुरूवात केली व १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले. महाराष्ट्रात या लढ्याला मराठवाडा मुक्तिसंग्राम म्हणून ओळखले जाते.

१७ सप्टेंबर २०२२ पासून या ऐतिहासिक लढ्याचे ७५ वे अर्थात अमृतमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. खरेतर हे वर्ष शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात साजरे होणे आवश्यक होते. त्याबाबत राज्य सरकारला अनेकदा स्मरण करून देण्यात आले. मात्र, मराठवाडा मुक्ति संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाबाबत शासनाची अनास्था व उदासीनताच दिसून आली. हे ऐतिहासिक ७५ वे वर्ष सुरू होऊन आता ७ महिने उलटले आहेत तरीही राज्य सरकारकडून अद्याप कोणत्याही लक्षवेधी व व्यापक कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे दिसून येत नाही.

काँग्रेसच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील व या कार्यक्रमातून स्वातंत्र्यसेनिकांचा सन्मान केला जाईल व जे स्वातंत्र्यसैनिक हयात नाहीत त्यांच्या वारसांचाही सन्मान केला जाणार आहे.

कर्नाटक विधानसभेच्या प्रचारासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची फौज

कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागासाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून १० मे राजी मतदान व १३ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनेही स्टार प्रचारकांबरोबरच इतर प्रचारकांची एक मोठी फौज उभी केली आहे. हे प्रचारक कर्नाटकातील विविध मतदारसंघात जाऊन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करतील.

महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रचारकांच्या यादीत प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री रमेश बागवे, सिद्धराम म्हेत्रे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, ओबीसी विभागाचे भानुदास माळी, एस.सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, एनएसयुआमचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख यांच्यासह सरचिटणीस, सचिव, प्रवक्ते व पदाधिकारी यांची ५१ सदस्यांची टीम बनवली आहे. कर्नाटकातील निवडणुकीत प्रचारासाठी महाराष्ट्रातून जाणारी ही प्रचारकांची टीम मराठी बहुल भागासह कर्नाटकच्या इतर मतदारसंघातही जोमाने प्रचार करतील.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *