Breaking News

धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुठेयत विचारताच भाजपा आमदाराने उध्दव ठाकरेंचे नाव घेत… सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगला रंगला वाद

राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा आज तिसरा आठवडा संपत आला. मागील तीन आठवड्यात अनेकवेळा विरोधक वेगवेगळ्या विषयावरील प्रस्ताव मांडत असतात मात्र राज्य मंत्रिमंडळातील एकही मंत्री सभागृहात गैरहजर असल्याचे प्रसंग अनेक वेळा घडले. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांना सुनावणलेही त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. त्यास २४ तासही उलटत नाही तोच आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २९३ चा प्रस्ताव मांडताना पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह कोणताच मंत्री उपस्थित नसल्याची बाब राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. त्यावरून भाजपाचे अतुल भातखळकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव घेतले. त्यामुळे भातखळकर आणि मुंडे यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर अजित पवार यांनीच भाजपा सुनावले.

दरम्यान, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारला गांभीर्य नसल्याची टीका करत संताप व्यक्त केला.

विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात ठराव मांडत असताना सत्ताधारी बाकांवर मंत्रीच अनुपस्थित नसल्याची बाब धनंजय मुंडेंनी निदर्शनास आणून दिली. यावेळी सरकारला गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला. जेव्हा विरोधी पक्षनेते २९३ चा ठराव मांडतात, तेव्हा किमान मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी थांबायला हवं. आत्ता इथे फक्त एक सहकारमंत्री आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारे विरोधी पक्षनेत्यांसहित विरोधी बाकांवरच्या सदस्यांचा अपमान होत असेल, तर इथे विरोधी पक्षांनी का बोलायचं? सगळे मंत्री लॉबीमध्ये बसले आहेत. याचं सरकारला काहीही गांभीर्य नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना काहीही गांभीर्य नाही, असा आरोप धनंजय मुंडे यांनी यावेळी सभागृहात केला.

यापाठोपाठ विरोधी बाकांवरून “हा महाराष्ट्राचा, जनतेचा अपमान आहे”, अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या. त्यावर अजित पवारांनीही सरकारवर टीका केली. मी अधिवेशन सुरू झाल्यापासून सांगतोय की यांना गांभीर्य नाही. आम्ही तर काही शब्द असे वापरतो की आम्हालाही मनाला वाईट वाटतं. पण अक्षरश: भोंगळ कारभार चालू आहे. कुणीही गंभीर नाही. पहिलं बाकडं तर मोकळंच असतं. त्यावर कुणीही नसतं. आम्हीही सरकार चालवलंय, अशा शब्दांत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.

अजित पवारांच्या मुद्द्यावर लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते जेव्हा बोलतात, तेव्हा सभागृहाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हजर असायला हवेत. एवढाही प्रोटोकॉल लोकशाहीत पाळायची इच्छा नसेल, तर आम्ही इथे शांत बसतो. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री इथे येईपर्यंत आम्ही काही बोलत नाही. कसं वागायचं ते आता तुम्ही ठरवा. त्यांनी किमान खेद तरी व्यक्त करा की गैरहजर होते म्हणून, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली.

विरोधकांनी केलेल्या या टीकेवर भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी, तुमचे मुख्यमंत्री अडीच वर्षं सभागृहात कुठे उपस्थित होते?, असा सवाल करताच त्यावरून अजित पवारांनी त्यांना सुनावत म्हणाले, अतुलजी, तुम्ही नीट आठवा. सभागृहात जेव्हा गरज असायची, तेव्हा असायचेच. पण उपमुख्यमंत्री म्हणून हा अजित पवार सकाळी ९ वाजल्यापासून असायचा. मी तुम्हाला प्रत्येकाला आदर द्यायचो, प्रत्येकाला सकारात्मक उत्तर द्यायचो, अशा शब्दांत अजित पवारांनी भाजपाला सुनावले.

Check Also

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *