Breaking News

राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन, विरोधकांच्या आक्रमकतेनंतर अध्यक्षांनीच सत्ताधाऱ्यांना भरला दम राहुल गांधी विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे कामकाज दोनवेळा स्थगित

अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असताना आज सकाळीच २०१९ साली निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी गुजरातमधील सूरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. मात्र विधिमंडळाचे कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी पक्षातील भाजपा-शिंदे गटाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जमा होत लंडनमधील सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यप्रकरणी जोडे मारो आंदोलन सुरु केले. या घटनेचे पडसाद विधानसभेचे कामकाज सुरु होताच सभागृहात उमटले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.

विधानसभा सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासानंतर प्रताप सरनाईक यांनी हा मुद्दा उपस्थित केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली. आशिष शेलार, अतुल भातखळकर, संजय शिरसाट यांनीही राहुल गांधी यांनी माफी मागण्याची मागणी केली. अतुल भातखळकर यांनी राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव मांडण्याची परवानगी मागितली.

राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा देत सत्ताधारी पक्षाचे सदस्य अध्यक्षासमोरील मोकळ्या जागेत गोळा झाले. काही सदस्यांनी सचिवांचे टेबल वाजवण्यास सुरवात केली. सर्वांनी जागेवर जाऊन बसावे असे आवाहन अध्यक्ष राहुल नार्वेकर वारंवार करीत होते. पण सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांचा गोंधळ सुरुच होता. अखेर विधानसभा अध्यक्षांनी दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. कामकाज पुन्हा सुरु होताच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी पुन्हा गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी असे चालणार नाही, आपल्याला कामकाज करायचे आहे. जागेवर जाऊन बसा, कोणालाही बोलायची परवानगी मिळणार नाही असे अध्यक्ष वारंवार सांगत होते. पण सत्ताधारी पक्षाचे सदस्य गोंधळ घालतच होते. त्यामुळे अध्यक्षांनी तीस मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. सत्ताधारी पक्षाच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज एकूण चाळीस मिनिटांसाठी स्थगित करावे लागले.

त्यानंतर कामकाज पुन्हा सुरु होताच काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेली वाक्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली.

सत्ताधारी पक्षाचा गोंधळ सुरु असतानाच विरोधी पक्ष नेते अजित पवार भाषणाला उभे राहिले आणि राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्याच्या प्रकाराचा निषेध केला विधीमंडळाच्या आवारात राहुल गांधी यांच्या फोटोला सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून जोडे मारण्याचा प्रकार झाला ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती- परंपरा नाही. आज काँग्रेस नेत्यांबद्दल अशा प्रकारची गोष्ट सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून घडली. प्रत्येक पक्षाचे राष्ट्रीय नेते म्हणून काम करतात. तुम्हाला तुमच्या पक्षाच्या नेत्यांचा अभिमान आहे तसाच आम्हालाही आमच्या नेत्यांचा अभिमान आहे. उद्या विरोधी पक्षाकडूनही घडेल. मात्र असे प्रकार घडू नयेत म्हणून विधानसभा अध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनी पावले उचलावीत असे आवाहन अजित पवार यांनी केले.

त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधिमंडळ आवारात जोडे मारू नयेत याच्याशी मी सहमत आहे. यापुढे जोडे मारो आंदोलन होऊ नये याची काळजी आपण घ्यायला हवी. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात वेडंवाकडे बोलणे ही हीन वृत्ती आहे. चुकीचे असेल तर तर तपासून घ्यावे आणि कामकाजातून काढून टाकावे असे सांगत त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरु करण्याची विनंती केली.

यावर मत व्यक्त करताना अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की विधिमंडळाच्या आवारात असंसदीय गोष्टी होणार नाहीत याची काळजी घ्या. नाही तर कडक कारवाई करावे लागेल योग्य आयुधांचा वापर करावा. मग निर्णय घेऊन आज या संदर्भात कोणताही प्रस्ताव किंवा नोटीस आलेली नव्हती. पण याचे संपूर्ण रेकाँर्डिग तपासले जाईल अशा शब्दात सभागृहाला आश्वस्त केले आणि पुन्हा कामकाज सुरु करण्याची विनंती केली. त्यानंतर सभागृहाचे पुढील कामकाज सुरु झाले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *