Breaking News

सुप्रिया सुळे म्हणाल्या, …हा तर महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधानांच्या उपस्थितीत अजित पवारांना भाषणाची परवानगी का नाही ?

देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मात्र यावेळी झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. त्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांना भाषणासाठी आमंत्रित करण्यात आले. आयोजकांच्या या कृत्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही आश्चर्यचकित झाले. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत थेट सवाल करत पंतप्रधानांच्या संभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण का करू दिले नाही असा सवाल करत हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची टीका केली.

या सोहळ्यासाठी श्री क्षेत्र देहू येथे आज पंतप्रधान मोदी आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कार्यक्रमाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीच्या शक्तीचेच केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याला देखील प्रशस्त करते असे म्हटले. आषाढी वारीसाठी सोमवारी तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले.

मात्र या कार्यक्रमानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. या कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण झाले. यामुळे अजित पवार यांना भाषणाची संधी का देण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अजित पवारांचे भाषण न झाल्याने पंतप्रधान मोदीही आश्चर्यचकित झाले. त्यांनी हाताने इशारा करुन याबाबत सूचना केली होती.
या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी न देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत देहू येथे कार्यक्रम झाला. या ठिकाणी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी संधी देणे हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत असेही त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमामध्ये अजित पवारांचे भाषण व्हावे यासाठी प्रोटोकॉल म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती करण्यात आली होती. पण पंतप्रधान कार्यालयाने विनंती स्वीकारली नाही. पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर अन्याय करण्यात आला आहे. आमच्या राज्याचा आमचा नेता व्यासपीठावर आहे. तिथे विरोधी पक्षनेत्यांना भाषण करु देता पण आमच्या नेत्यांना भाषण करु देत नाहीत. ही दडपशाही असून आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचे काम केले आहे. प्रोटोकॉलनुसार अजित पवारांना भाषण करण्याची संधी द्यायला हवी होती असेही त्या म्हणाल्या.

या घटनेनंतर या कार्यक्रमामध्ये वारकऱ्यांना बोलू देण्यात आले असे भाजपाने म्हटले. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीस हे वारकरी नाहीत ते राजकीय पुढारी आहेत. हे बालिश आणि हास्यास्पद वक्तव्य असल्याचे भाजपा म्हणत असेल तर सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री कार्यालयातून आलेली माहिती पत्रकारांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या प्रोटोकॉलचे पालन झालेले नाही. अजित पवार हे फडणवीसांसारखे भाषणासाठी हापापलेले नसतात. दोघांमध्ये खूप फरक आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील तर पंतप्रधान मोदींनी त्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करायला पाहिजे होती. भाजपाने आणि त्यांच्या आध्यात्मिक आघाडीने महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान राज्याच्या राजशिष्टाचार विभागाशी याबाबत संपर्क केला असता ते म्हणाले की, राज्यात होणाऱ्या जवळपास सर्वच केंद्रिय मंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कार्यक्रमाबाबत एक राजशिष्टाचार आहे. मात्र पंतप्रधान किंवा राष्ट्रपती एखाद्या कार्यक्रमासाठी राज्यात येणार असतील त्याचा राजशिष्टाचार पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडून निश्चित करण्यात येतो आणि त्याची माहिती आम्हाला कळविली जात असल्याचे त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *