Breaking News

संजय शिरसाटांचा उध्दव ठाकरे यांना सवाल, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगा तुम्ही…. शंकरराव गडाख आणि इतरांना मंत्रीपद देताना तुम्ही खोके घेतले का ?

राज्यात स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सातत्याने टीकेची झोड उठविण्यात येत आहे. मात्र आज छत्रपती संभाजी नगर येथे पहिल्यांदाच महाविकास आघाडीची पहिलीच वज्रमुठ सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) चे नेते संजय शिरसाट यांनी थेट ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर प्रश्नांची सरबती करत, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगा शंकरराव गडाख यांच्यासह इतर दोघांना मंत्री का केलं ? त्यासाटी खोके घेतले होते की नाही? असा थेट सवाल केला.

संजय शिरसाट हे आज प्रसारमाध्यमांशी बोलताना उध्दव ठाकरे यांच्यावर प्रश्नांची सरबती केली. या प्रश्नांना उध्दव ठाकरे हे उत्तर देणार की नाही संध्याकाळच्या सभेत स्पष्ट होईल.

यावेळी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी शंकरराव गडाख यांना मंत्रिपद का दिलं? हे आजच्या सभेत क्लिअर करावं. तसेच इतर दोन आमदारांनाही राज्यमंत्रिपद का दिलं हे सुद्धा स्पष्ट करावं. सरकारकडे पूर्ण बहुमत होतं. बहुमताला आकडा कमी नसतानाही तुम्ही खोके घेऊन गडाख आणि इतर दोन मंत्र्यांना मंत्रीपद दिलं. तुम्ही खोके घेतले होते की नाही? खरं सांगा. तुमच्या पक्षात हे लोक आले होते का? मग आता या जाहीर सभेत शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगा की, तुम्ही गडाखाना मंत्रिपद घेताना खोके घेतले नाही, अशी प्रश्नांची सरबती करत एकप्रकारे आव्हानच दिले.

तसेच पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, मी जे आरोप करतोय त्याला सबळ पुराव्यांची काही गरज नाही. आमच्याकडे पुरेसे आमदार होते. संख्याबळ होतं. बहुमत होतं. असं असताना ५६ आमदार सोडून तुम्ही गडाख आणि अपक्ष आमदारांना मंत्रिपद का दिल? यात खोक्याचं काम झालं नसेल का?, असा सवाल करत आजची सभा ही हतबल सभा असल्याची खोचक टीकाही केली.

त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांबरोबर केलेल्या युतीवरून संजय शिरसाट यांनी उध्दव ठाकरे यांना खोचक सवाल करत म्हणाले, आजच्या सभेत तुम्ही संविधानाची पूजा करणार आहात. ज्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं, त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्याशी तुम्ही युती केली आहे, असं असताना प्रकाश आंबेडकर या सभेत का नाही? आंबेडकरांना सभेपासून दूर ठेवण्याचं कारण काय? असा उपरोधिक सवालही केला.

यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेचाही समाचार घेतला. संजय राऊत यांना फक्त रेड्याचं दूध काढायचं माहिती आहे. गाई आणि म्हशीचं माहीत नाही. काल संजय राऊत यांचा स्टंट झाला ना? २ तासात कळलं ना काय झालं म्हणून. उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. हेच एकदा त्यांनी खासगीत बोलून दाखवलेलं होतं. ही किमया फक्त संजय राऊत करू शकतात, असा टोलाही संजय राऊत यांना संजय शिरसाट यांनी लगावला.

पाच आमदार म्हणजे शिवसेना नाही हे मी मानतो. इतके लोक तुम्हाला सोडून का जात आहेत? या संदर्भात जरा विचार करा. तुमची वागणूक तर याला कारणीभूत नाही ना? असा टोमणाही संजय शिरसाट यांनी ठाकरेंना लगावला.

Check Also

अजित पवार यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, …तातडीने कार्यक्रमांचे आयोजन करा ७५ कोटी रूपयांचा निधी मंजूर पण एकाही कार्यक्रमाला मंजूरी दिली नाही

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याला ७५ वर्षे पूर्ण होत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *