Breaking News

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे मोठे निर्णयः औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर आणि… तर विमानतळाला पाटील यांचे नाव, सरकारी वसाहतीत शासकिय कर्मचाऱ्यांना भूखंड

२०१४ साली राज्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेनेच्या सरकारपासून रखडलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न आज अखेर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने सोडवित अखेर करून दाखविले. आज बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचे नामांतर धाराशीव असे करण्यात आले. त्याचबरोबर बहुचर्चित नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिकांनाकडून करण्यात येत असलेल्या मागणीनुसार दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासही या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली.

याशिवाय वांद्रे येथील शासकिय वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांना कायमस्वरूपी घरे देण्याच्या उद्देशाने वांद्रे येथील शासकिय पुर्नविकासात त्यांच्यासाठी एक भूखंड राखीव ठेवण्यासही मान्यता देण्यात आली. त्यामुळे वांद्रे शासकिय वसाहतीत वर्षानुवर्षे राहणाऱ्या निवृत्त शासकिय कर्मचाऱ्यांना आता हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य मंत्रिमंडळातील हे महत्वाचे निर्णय

औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याबाबत मान्यता
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल.
—–०—–

बांद्रा शासकीय वसाहतीतील रहिवाशांच्या सदनिकांसाठी भूखंड
बांद्रा येथे शासकीय वसाहतीतील रहिवाशांना मालकी हक्काच्या सदनिका देण्यासाठी भूखंड उपलब्ध करण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
या सदनिकांसाठी भूखंड उपलब्ध व्हावा अशी परिवहन मंत्री अनिल परब यांनी विनंती केली होती. यानुसार सदरील प्रस्तावास तत्वत: मान्यता देण्यात आली.
……00…

नवी मुंबईतील विमानतळाचे नामकरण लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यास मान्यता
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे “लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून ११६० हे. क्षेत्रावर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसीत करण्यात येत आहे. या संपूर्ण ११६० हे. जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत. या विमानतळाच्या नामकरणाच्या अनुषंगाने नवी मुंबईमधील विविध संघटना व राजकीय पक्षांकडून मागणी करण्यात येत होती.
नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या विकासासाठी तसेच त्यांच्या मागण्यांसाठी लोकनेते स्वर्गीय दि.बा. पाटील यांचे योगदान व विविध संघटनांची मागणी विचारात घेता या विमानतळाचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *