Breaking News

भारतीयांसाठी हा सूचक संदेश तर नाही नाः सेंगोलची विधिवत नव्या संसदेत प्रतिष्ठापना पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर साधु संत नव्या संसदेत

संयुक्त पुरोगामी आघाडी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात नव्या संसद उभारणीचा प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली होती. मात्र २०१४ साली संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार जाऊन केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मोदी सरकार सत्तेत आले. त्यानंतर त्या प्रस्तावा पूर्ण करण्याच्यादृष्टीने विचार सुरु झाला. ऐन कोरोना काळ सुरु असतानाही या नव्या संसद उभारणीचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत होते. दोन वर्षे पाच महिन्यात या संसदेचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा आज २८ मे रोजी लोकर्पण सोहळा नवी दिल्लीत पार पडला. परंतु या नव्या संसदे उभारणीच्या निमित्ताने देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी बहिष्कार घातलेला असतानाही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना बाजूला ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःचे या वास्तूचे उद्घाटन केले. मात्र या वास्तूच्या उद्घाटनाच्या निमित्ताने धर्मनिरपेक्ष भारताच्या वास्तूत पहिल्यांदाच धर्माधिष्ठीत गोष्टींचा वापर करण्यात आल्याने भारत धर्मनिरपेक्ष देश की हिदूत्ववादी देश असा संभ्रम निर्माण झाला आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात भल्या सकाळी नव्या संसदेच्या आवारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत वैदिक पध्दतीच्या हवनाने झाली. त्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सेंगोल इंग्रजाकडून स्विकारला असल्याचा नवा इतिहास मोदी सरकारकडून सांगितल्या नंतर हाच सेंगोल अर्थात राजसत्तेचा दंड पुन्हा देशभरातील हिंदू धर्मातील विविध पंथाच्या साधूंकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्विकारला.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सेंगोलची (राजदंड) विधीवत पूजा करून लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या बाजूला स्थापित केला आहे. तत्पूर्वी मोदींनी या सेंगोलला साष्टांग दंडवत घातला. यावेळी तामिळनाडूवरून आलेल्या संत मंडळींनी वैदिक मंत्रांचा जप केला. या विधींमध्ये पंतप्रधानांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लादेखील सहभागी झाले होते.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला नवीन संसदेत प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवन विधी केले. यावेळी सेंगोलची पूजा केली. तसेच मोदींनी सेंगोल आणि उपस्थित संतांना साष्टांग दंडवत घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंगोलची पूजा केली, त्यानंतर संतांसमोर आदरपूर्वक साष्टांग नमस्कार केला. यानंतर संतांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सेंगोलसह नवीन संसद भवनात प्रवेश केला. त्यांनी सेंगोल म्हणजेच राजदंड लोकसभेच्या अध्यक्षांच्या खुर्चीच्या बाजूला वैदिक मंत्रोच्चारात स्थापित केला.

सेंगोल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राजदंडाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या राजदंडाकडे स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते. प्रतीकात्मकदृष्ट्या सत्तेचे हस्तांतर म्हणून ब्रिटिशांनी हा राजदंड पंडित नेहरू यांच्याकडे सोपवला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १४ ऑगस्ट १९४७ रोजी सायंकाळी १०.४५ वाजता हा राजदंड ब्रिटिशांकडून स्वीकारला होता अशी माहिती भाजपाच्या आयटी सेलकडून नुकतीच प्रसारीत करण्यात आली आणि त्या इतिहासाचा इन्कार काँग्रेसने केला तरी सर्व प्रसारमाध्यमांवरून तोच इतिहास दाखविण्यात आला. विशेष म्हणजे त्याचा कोणताही अधिकृत पुरावा अद्याप बाहेर आला नाही.

चोला साम्राज्यात सत्ता एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे सत्ता सोपवताना राजदंडाचा म्हणजेच सेंगोलचा वापर केला जायचा. या सेंगोलकडे प्रतीकात्मकतेने राजवट आणि सत्ता म्हणून पाहिले जायचे. नव्याने राज्याभिषेक झालेल्या राजाला हा सेंगोल देऊन न्याय्य तसेच पारदर्शक पद्धतीने राज्यकारभार करावा, असे सांगितले जाई. मात्र भारतीय राज्यघटनेनुसार भारतात राजेशाही आणि धार्मिक गोष्टीला कोणतीही कायदेशीर मान्यता नसताना पंतप्रधान मोदी यांनी या सर्व गोष्टी एखाद्या राजाप्रमाणे केल्याचे दिसून येत असल्याची चर्चा धर्मनिरपेक्षवादी नागरिकांमध्ये सुरु झाली आहे.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *