Breaking News

विरोधकांच्या बहिष्कारावरून देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, मग ते लोकशाही विरोधी होतं का? मोदींना विरोध करण्याचा ज्वर चढला

नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना बोलावलं नाही त्यामुळे आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार घालत आहेत. यासंदर्भातलं एक पत्रकही विरोधकांनी जारी केलं आहे. याबाबत जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी यावर खरमरीत उत्तर दिलं आहे. कावीळ झाल्यासारखं वागणं बरोबर नाही. तसेच ती जी कारणं सांगत आहेत ती हास्यास्पद असल्याचा विरोधकांना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकशाहीमध्ये अशाप्रकारचं कावीळ झाल्यासारखं वागणं हे अत्यंत अयोग्य आहे. नवीन संसद भवन हे देशाची शान आहे. जेवढ्या कमी वेळात हे तयार झालं आहे त्यामुळे देशाची ताकद दिसते आहे. जेवढ्या भव्यतेने हे संसद भवन तयार झालं आहे, जगासमोर भारताची ताकद आली आहे. मात्र मोदीजींना विरोध करण्याचा ज्यांना ज्वर चढला आहे असे लोक लोकशाहीच्या मंदिराच्या उद्घाटनालाही जात नाहीत. ते कारणं सांगत आहेत ती हास्यास्पद आहेत. यापूर्वी १९७५ ला लोकसभेच्या एनएक्स इमारतीचं उद्घाटन स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी केलं होतं. मग ते लोकशाही विरोधी होतं का? यापूर्वी संसदेची जी भव्य लायब्ररी आहे त्याचं भूमिपूजन स्वर्गीय राजीव गांधींनी केलं होतं. ते लोकशाहीविरोधी होतं का? असा सवाल केला.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस सांगितले की, मूळात यांचा प्रश्न एवढाच आहे की वर्षानुवर्षे नवीन संसद भवन व्हायची चर्चा व्हायची ते कुणी बनवू शकलं नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते संसद भवन बनवून दाखवलं. त्यामुळे कुठेतरी पोटात दुखतंय आणि तेच दिसतं आहे. विरोधी पक्षांनी जो निर्णय घेतला आहे त्यावरुन हेच दिसतं आहे की त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही.

मला अतिशय आनंद आहे की केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आणि त्यांना एकमेकांची गरज लागते आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी अरविंद केजरीवाल कुणाही सोबत जायला तयार आहेत. उद्धव ठाकरे हे कुणाही सोबत बसायला तयार आहेत. यावरुनच भाजपाची ताकद किती आहे त्यांना समजलं आहे. २०१९ लाही असा प्रयोग त्यांनी करुन झाला आहे. विविध विधानसभांमध्येही हा प्रयोग करण्यात आला आहे. मात्र असा प्रयोग तेव्हाही यशस्वी झाला नाही आणि आताही यशस्वी होणार नाही असंही फडणवीस यांनी सांगितले.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *