Breaking News

संकल्प सत्याग्रहात काँग्रेसचा इशारा, पंतप्रधान मोदींना उत्तर द्यावेच लागेल राहुल गांधींवरील कारवाई दडपशाही व हुकूमशाहीचे उदाहरण, काँग्रेस अशा कारवाईला घाबरत नाही- पृथ्वीराज चव्हाण

राहुल गांधी यांनी अदानी उद्योग समुहातील महाघोटाळा उघड केल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारची जगभर नाच्चकी झाली आहे. अदानीच्या कंपनीत वीस हजार कोटी रुपयांचा काळा पैसा आला तो कोणाचा आहे याची चौकशी करण्याची मागणी करत राहुल गांधींनी अदानी-मोदींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्यामुळेच राजकीय आकसातून त्यांच्यावर कारवाई केली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व जिल्ह्यात सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सत्याग्रह केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली नागपूरच्या संविधान चौकात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री राजेंद्र मुळक, आ. वजाहत मिर्झा, आ.अभिजीत वंजारी, प्रदेश सरचिटणीस उमाकांत अग्निहोत्री, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, अतुल कोचेटा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी अदानीची चौकशी करण्याची मागणी करत असताना भाजपा मात्र भ्ष्ट अदानीची बाजू घेत आहे. अदानीच्या भ्रष्टाचाराला भाजपाचा पाठिंबा आहे का? भाजपाच्या संरक्षणात अदानीने देशातील जनतेला लुटले आहे. सुरत सत्र न्यायालयानं राहुल गांधींना शिक्षा सुनावल्यानंतर अत्यंत जलतगतीने म्हणजे २४ तासाच्याआत खासदारकी रद्द करण्यात आली यामागे भाजपाचा हेतू काय होता हे स्पष्ट होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाच्या माध्यमातून इंग्रजांच्या अत्याचाराचा सामना केला होता आणि याच सत्याग्रहाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र मिळवून दिले होते. नरेंद्र मोदींच्या हुकुमशाही व्यवस्थेविरोधात काँग्रेस पक्ष देशभर सत्याग्रह करत आहे.

मुंबईत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्याग्रह करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, माजी आमदार मधू चव्हाण यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळेस म्हणाले की, आजचा सत्याग्रह एका नव्या आंदोलनाची सुरुवात आहे, एका क्रांतीची सुरुवात आहे, स्वातंत्र्याच्या नव्या लढाईची सुरुवात आहे. अदानी समूहाच्या आर्थिक घोटाळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काय संबंध आहे? असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केला. पण यावर नरेंद्र मोदींनी उत्तर दिले नाही. अदानींबाबत एक शब्दही काढला नाही उलट अदानींबाबत प्रश्न केला म्हणून राहुलजींचा माईक बंद केला.राहुलजींच्या प्रश्नांना घाबरून त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांची खासदारकी रद्द करण्यात आले पण काँग्रेस नेते राहुल गांधींचा आवाज हा देशातील १४० कोटी जनतेचा आवाज आहे. तो काही केल्या दाबता येणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर द्यावेच लागेल.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळेस बोलताना म्हणाले की, राहुल गांधी यांच्याविरोधात षडयंत्र करून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली, हा देशातील लोकशाहीचा खून आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर ईडी व सीबीआय सारख्या संस्थांद्वारे कारवाई केली जात आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे. विरोधकांचा आवाज दाबून देशात दडपशाही व हुकूमशाहीची वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. देशात एक प्रकारे अघोषित आणीबाणी सुरु आहे. गौतम अदानीच्या कंपनीत २० हजार कोटी कुठून आले. याबद्दल प्रश्न विचारला असता पंतप्रधान मोदी उत्तर देत नाहीत. राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई देशात सुरु असलेल्या दडपशाही व हुकूमशाहीचे उदाहरण आहे पण राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष अशा कारवाईला कधीच घाबरत नाही. काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न मांडतो, जनतेसाठी लढतो आणि यापुढेही लढत राहणार.

लातूर येथे माजी मंत्री अमित देशमुख व आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर येथे आमदार पी. एन. पाटील सडोलीकर आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, आमदार जयंत तासगावकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

उत्तर मध्य मुंबईमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, नाशिक, अमरावती, चंद्रपूर, सोलापूर, धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नवी मुंबई, पालघर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नंदूरबार, धुळे, वाशिम, यवतमाळ, परभणीसह सर्व जिल्ह्यात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले , उद्या सोमवारीही काही जिल्ह्यात आंदोलन केले जाणार आहे.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *