Breaking News

रिसॉर्टप्रकरणी सोमय्या दिवसभर दापोलीत तर मंत्री परब म्हणाले, ते माझे नाहीच सोमय्यांचे पोलिस ठाण्यात आंदोलन

दापोलीतील एका अनधिकृत रिसॉर्टवरून गेले महिनाभर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे रान उठवित असून या रिसॉर्टवर हातोडा चालविण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा घेवून दापोलीत पोहोचले. तसेच पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलनही सुरु केले. यावरून दापोलीतील वातावरण तणावग्रस्त बनलेले असताना ज्या रिसॉर्टवरून हे राजकिय नाट्य सुरु झाले आहे तो रिसॉर्ट माझा नसल्याचा दावा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या आंदोलनातील हवाच काढून घेतल्या सारखे झाले आहे.

मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यात यावे म्हणून सोमय्या दापोलीत दाखल झाले आहेत. यावरुन आता अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले असून हिंमत असेल तर रिसॉर्ट पाडून दाखवा असे आव्हान परब यांनी किरीट सोमय्या यांना दिले.

हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे आणि शिवसेना नेते अनिल परबांच्या मालकीचे आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. त्या रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी सोमय्या दापोलीत दाखल झाले. मात्र शिवसेनेकडूनही किरीट सोमय्या यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेल असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये सोमय्या यांना विरोध करण्यासाठी निदर्शने करत काळे झेंडे दाखवित आहेत.

हे रिसॉर्ट माझे नाही. याबाबत चौकश्या झाल्या आहेत. वेगवेगळ्या यंत्रणांकडून सर्व कागदपत्रे तपासून झाली आहेत. हे रिसॉर्ट माझे नाही हे मी वारंवार सांगितले आहे आणि त्याबाबत न्यायालयात याचिका दाखल केलीय. किरीट सोमय्या हे माझे रिसॉर्ट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे त्यांनी कागदोपत्री सिद्ध करावे असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

किरीट सोमय्या पालिकेचे नोकर आहेत का? असा सवाल करत ते कारवाई करुन तोडण्यासाठी जाणार आहेत. एखादी अनाधिकृत गोष्ट असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा पालिकेला अधिकार आहे. किरीट सोमय्या वातावरण खराब करत आहेत. कोकणात काम करणारे आहेत ते भयभीत झालेले आहेत, त्यांनी पोलिसांना तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.

कारवाई झाली नसेल तर ज्या संस्था हे काम पाहतात त्यांचेच हे काम आहे. किरीट सोमय्या त्या संस्थेचे कर्मचारी नाहीत. ते कसे बोलू शकतात मी तोडणार म्हणून आणि हिंमत असेल तर त्यांनी तोडून दाखवावे. ते फक्त नौटंकी करत आहेत. मी तिथला पालकमंत्री असल्याने हॉटेलवाल्यांच्या व्यवसायावर आक्रमण करण्यात येत आहे. रिसॉर्ट परवानगी घेऊन बांधले नसेल तर त्यावर कारवाई होईल. पण त्याच्यासोबत माझे नाव जोडून वातावरण खराब करण्याचे काम सोमय्या करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

माझा संबंध नसताना वारंवार आरोप करन प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने मुंबई उच्च न्यायालयातही जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *