Breaking News

उध्दव ठाकरेंचा निर्णय फिरवत शिंदे सरकारने महापालिका नगरसेवकांची संख्या घटविली मुंबईत २३६ ऐवजी २२७ नगरसेवक राहणार अन्य महापालिकेतील नगरसेवक संख्या कमी होणार

तत्कालीन उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागाने मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांमधील सदस्य संख्या वाढीचा निर्णय आज शिंदे-फडणवीस सरकारने रद्दबातल ठरवित २०१७ साली झालेल्या निवडणूकांमध्ये असलेल्या जागा इतकीच सदस्य संख्या ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.

शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या २३६ वरून पूर्वी प्रमाणेच २२७ इतकी करण्यात आली आहे. याशिवाय अन्य महापालिकेत लोकसंख्येच्या प्रमणात नगरसेवकांची संख्या ठरणार असून ती सुद्धा काही ठिकाणी कमी होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील आरक्षण सोडत पुन्हा एकदा काढावी लागणार आहे. तसेच वार्डातील आरक्षणही बदलले जाणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महापालिकांना नव्याने प्रभाग रचना तयार करून फेर आरक्षण सोडत काढावी लागेल. याशिवाय महापालिका निवडणूक तीन ऐवजी चार प्रभाग सदस्य पद्धतीने घेण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेतला जाऊ शकतो. यामुळे ओबीसी आरक्षणामुळे आधीच लांबलेल्या महापलिका निवडणुका आणखी लांबणीवर पडून त्या वर्षाखेरीस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीशी संबंधित निर्णय बदलेले जात आहेत. आघाडीचे निर्णय बदलून शिंदे सरकारने थेट नगराध्यक्ष, थेट सरपंच निवड असे निर्णय घेतले आहेत. या पाठोपाठ आता महापलिका सदस्य संख्या पूर्ववत केली आहे.

भाजपाच्या दबावामुळे शिंदे यांना हे निर्णय घेण्यास भाग पाडत असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचे मंत्रिमंडळ राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम घेणारे निर्णय घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महाविकास आघाडी सरकारने २७ ऑक्टोबर २०२१ च्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई महापलिका नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ इतकी करण्याचा निर्णय घेतला होता. आता आजच्या निर्णयामुळे हि संख्या २२७ होईल. मुंबई वगळता इतर महानगरपालिकांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्येत सुधारणा होणार आहे. याआधी महापालिकेत किमान ६५ तर कमाल १७५ सदस्य संख्येचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे बहुतांश महापलिकेत नगरसेवकांची संख्या घटण्याची चिन्हे आहेत.

मुंबई वगळता अन्य महापालिकेतील नगरसेवक संख्या
-३ लाखांपेक्षा अधिक आणि ६ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ६५ इतकी तर कमाल संख्या ८५ इतकी असेल. ३ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १५ हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.

-६ लाखांपेक्षा अधिक आणि १२ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ८५ इतकी तर कमाल संख्या ११५ इतकी असेल. ६ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक २० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. १२ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ४० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.

-१२ लाखांपेक्षा अधिक वआणि २४ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ११५ इतकी तर कमाल संख्या १५१ इतकी असेल. २४ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ५० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.

-२४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १५१ इतकी तर कमाल संख्या १६१ इतकी असेल. ३० लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १ लाख लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.

– ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १६१ इतकी तर कमाल संख्या १७५ इतकी असेल.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *