Breaking News

अचानक झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली ‘या’ विषयावर चर्चा पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या, मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा आढावा

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पडले असून एक गट एकनाथ शिंदे यांचा तर दुसरा गट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा झाला आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या गटाने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने आता शिवसेनेतील अंतर्गत लढाई न्यायालयीन झाली आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. यापार्श्वभूमीवर आज अचानक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. तसेच या बैठकीत राज्यात कमी पडलेल्या पाऊस आणि पेरण्या खोळबंल्याच्या प्रश्नावर चर्चा झाली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगामाबाबतही गांभीर्याने आढावा घेण्यात आला. राज्यातील पेरण्याची स्थिती समाधानकारक नसल्याची माहिती देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
गेल्यावर्षी राज्यात आजच्या घडीला सरासरी २७० मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ १३४ मिमी. पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ १३ टक्के (२०.३० लाख हेक्टर) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेणार
कमी पावसामुळे शहरांमध्ये देखील पाणीपुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे उद्या (२९ जून ) नगर विकास खात्याचा कार्यभार असलेले मंत्री सुभाष देसाई हे सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून पाणी पुरवठ्याचे नियोजन कसे केले जाणार आहे याबाबत आढावा घेणार आहेत.

राज्यात ४९६ टँकर्सने पाणीपुरवठा
राज्यात २७ जून अखेर ६१० गावे आणि १२६६ वाड्यांना ४९६ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टँकर्सची संख्या ६६ तर खाजगी टँकर्सची संख्या ४३० इतकी आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत टँकर्सची संख्येत ३१ ने तर टचाईग्रस्त गावांच्या संख्येत २४ ने आणि वाड्यावस्त्यांच्या संख्येत १३० ने घट झालेली आहे.

राज्यातील पाणीसाठा
राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा २८ जूनअखेर २१.८२ टक्के इतका आहे. विभागवार पाणीसाठ्यामध्ये अमरावती विभागातील प्रकल्पात ३३.८० टक्के, मराठवाडा विभागात २७.१० टक्के, कोकण विभागात ३४.४३ टक्के, नागपूर विभागात २६.८१ टक्के, नाशिक विभागात २०.०२ टक्के, पुणे विभागात १२.३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *