Breaking News

वंचित-शिवसेना युतीची घोषणा केल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोदींचाही अंत होणार ईडीच्या मार्फत राजकिय नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न

दादर येथील डॉ.आंबेडकर भवन येथे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युतीची बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं औचित्य साधून घोषणा करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या युतीची घोषणा केली. तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखाताई ठाकूर उपस्थित होत्या. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत पंतप्रधान मोदींचाही अंत होईल असे वक्तव्य केले.

यावेळी बोलताना वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्थात ईडी मार्फत राजकीय नेतृत्व संपवण्याचं काम सुरु आहे. पैसे खाल्ले असतील तर न्यायालयात घेऊन जात जेलमध्ये टाका. पण, न्यायालयात न जाता नेतृत्वावर आक्षेप घेतला जात आहे. आपण कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलो नाही. एकदिवस आपलाही अंत होणार आहे. तसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही अंत होणार असल्याचे वक्तव्य केले.

नरेंद्र मोदींनी स्वत:च्या पक्षातील नेतृत्व संपवलं आहे. कोणत्याही नेत्याला उभारी घेऊ दिली जात नाही. केंद्रातील अनेक मंत्री भेटल्यावर सांगतात आम्ही फक्त फाईल्स संभाळण्याचं काम करतो, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला. यावेळी पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की, संक्रमणाच्या काळात राजकीय नेतृत्व घडत असते. त्यामुळे महाराष्ट्र अथवा बाहेरील प्रादेशिक पक्ष स्वत:चं नेतृत्व आणि संघटन उभं करत असतील, तर त्यांना आम्ही मदत करणार आहोत. राजकारण विवेक आणि नितिमत्तेवर येण्यासाठी उद्धव ठाकरेंसह प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली.

जिंकून देणं मतदारांच्या हातात आहे. ते राजकीय पक्षांच्या हातात नाही. परंतु, उमेदवारी देणं राजकीय पक्षांच्या हातात आहे. महाराष्ट्राची सत्ता १६९ कुटुंबात होती. त्यात आता १० कुटुंबात वाढ झाली आहे. नातेवाईकांचं राजकारण वाढल्याने गरिबांचं राजकारण बाजूला पडत गेलं. त्यामुळे भांडवलशाही आणि लुटारुंची सत्ता सुरु झाली, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना एकत्र आल्याने निवडणुकीत बदलाचं राजकारण सुरुवात होणार आहे. जनता दलाचा जाहीरनामा आजही काढला तर शेवटं लिहलं होतं, आम्ही मंडल कमिशन लागू करू. दुर्दैवाने जनता दलाचा पक्ष मंडल कमिशनवर पडला, अशी परिस्थिती आहे. सामाजिक प्रश्नाला हात घातला जातो, तेव्हा समाजव्यवस्थेमधील गणिते बदलली जातात. गेली अनेक वर्षे उपेक्षितांचं राजकारण सुरु होण्यासाठी प्रयत्न केला. ही चळवळ आम्ही चालवत होतो. तिला आमच्या मित्र पक्षाने गिळंकृत किंवा मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला. पण, आम्ही न जुमानता आंदोलन करत राहिलो, लढत राहिलो असेही स्पष्ट केले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *