Breaking News

शरद पवार यांनी सत्कार केल्यानंतर शिवराज राक्षेकडून व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा पहिल्यांदाच गैरहजर राहिल्याचे कारणही स्पष्ट केले

पुणे येथे काल ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार रंगला. या स्पर्धेला पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अनुपस्थित होते. आजवर अनेकदा स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहत असत. यावेळी महाराष्ट्र केसरीच्या आयोजनात आणि निमंत्रित मान्यवरांमध्ये भाजपातील नेतेच दिसत होते. आज शरद पवार यांच्या हस्ते पुणे येथे महाराष्ट्र केसरीचा विजेता शिवराज राक्षे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी शिवराज राक्षेकडून ऑलम्पिक पदकाची अपेक्षा व्यक्त करत स्वतःच्या गैरहजेरीचे कारणही सांगितले.

शरद पवार पुढे म्हणाले, शिवराजला सांगायचे आहे की महाराष्ट्र केसरी हा पहिला टप्पा आहे. यानंतर राष्ट्रीय, आशिया स्पर्धा आणि देशाच्या संबंध कुस्तीप्रेमींचे स्वप्न असलेल्या ऑलिम्पिकच्या स्पर्धा आहेत. योगायोगाने आज खाशाबा जाधव यांची जयंती आहे. त्यांनी सर्वात आधी ऑलिम्पिकमध्ये प्रथम पदक मिळवले होते. त्यानंतर इतक्या वर्षात महाराष्ट्रातून कुणीही पदक मिळवले नाही. आमची इच्छा आहे की, शिवराजने भारतासाठी पदक मिळवावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.

शरद पवार यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र केसरी जिंकल्याबद्दल शिवराजचे मनापासून अभिनंदन. शिवराजने नांदेडचे प्रतिनिधित्व केले असले तरी पुण्यातील राजगुरूनगरमधील खेड येथे त्याचे लहानपण गेले. लहानपणापासून त्याला घरात कुस्तीचा वारसा लाभलेला आहे. शिवराजच्या नजरेसमोर एक उद्दिष्ट होते, जे त्याने काल महाराष्ट्र केसरीचा खिताब मिळवून उद्दिष्ट पूर्ण केले. शारीरिक व्याधीवर मात करत शिवराजने हे दैदिप्यमान यश मिळवले. महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना मी टीव्हीवर पाहत होतो. शिवराज आणि महेंद्र एकाच तालमीत तयार झालेले पैलवान आहेत. यामुळे निकालाबाबात उत्सुकता होती. शिवराजने चांगली कुस्ती खेळली.

शरद पवार हे राजकारणासोबतच क्रीडा क्षेत्रातही विशेष ऋची ठेवतात. मात्र आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी खेळांडूची यादी वाचून दाखवत कुणाला काय काय मदत केली, याचा पाढाच वाचला. शिवाय मी आज हे जाहीरपणे सागंतोय, असेही ते म्हणाले.

अनेक खेळांना आणि खेळांडूना मी पाठिमागून मदत करण्याची भूमिका घेत आलो आहे. क्रिकेटसाठीही मी काम केले आहे. पण कुस्तीसाठी मी विशेष प्रयत्न करत आलो आहे. २५ ते ३० वर्षांपासून मी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपद भूषिवत आलो आहे. सर्व कुस्तीतील पैलवान हे ग्रामीण भागातून येतात. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत अडचणींवर मात करुन मल्ल यश मिळवत असतात. या मल्लांना उत्तम प्रशिक्षणाचीही गरज असते. ती जबाबदारी काका पवार यांनी उचलली आहे. किरण भगत, अभिजीत कटके, उत्कर्ष काळे, राहुल आवारे, शिवराज राक्षे या मुलांना जी काही मदत करता येईल, ती करण्याची भूमिका आम्ही घेतली. आज पहिल्यांदा आम्ही हे जाहीरपणे सांगत होतो. आजवर मी हे कधीही सांगितले नाही. कोणताही गाजावाजा न करता मी ही मदत करत होतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शरद पवार यांची कमतरता या स्पर्धेच्या सोहळ्यात दिसून आली. तुम्हाला निमंत्रण नव्हते का? तुम्ही का नाही आलात याबाबत प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पवार म्हणाले, मला स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याचे निमंत्रण होते. मात्र मला मुंबईत काही महत्त्वाचे काम होते. त्यामुळे मी आलो नाही, असे सांगत पवारांनी गैरहजेरीचे कारण सांगितले.

यावेळी पवारांनी तसेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वादावर भाष्य करताना म्हणाले, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा वाद कोर्टात आहे, त्यामुळे त्यावर मी जास्त बोलू इच्छित नाही. आपण खेळावर लक्ष दिले पाहीजे, इतर बाबींवर जास्त चर्चा करायला नको, अशी भूमिकाही मांडली.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *