मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपाचे आमदार सुरेश धस, मनोज जरांगे पाटील, राणा जगजित सिंग पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह यांच्यासह अनेक राजकिय नेते तथा कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. या मोर्चासमोर बोलताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत ड्रग्ज प्रकरणातील आरोपीही यांच्या संपर्कात असल्याचा आरोप करत हे आहेत आकाचे फोटो असे म्हणत त्यासंदर्भातील फोटोही यावेळी दाखविले.
सुरेश धस पुढे बोलताना म्हणाले की, साधारणत आठ महिन्यापूर्वी एका वर्तमान पत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती. ती बातमी होती गुजरातमध्ये ८९० कोटी रूपयांचे ड्रग्ज सापडल्याची. या ड्रग्ज प्रकरणात एक सानप आणि अन्य एकजण मागील वर्ष दिडवर्षापूर्वी दोघे अटकेत आहेत. त्यांचा ठावठिकाणा कुठे आहे याची माहिती नाही. पण त्या प्रकरणातील सानप नावाचा आरोपी आहे त्याचा फोटो कोणाबरोबर आहे ते बघा असे सांगत ( त्यांच्याकडील सानप आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो दाखवला) हा आहे मेन आकाचा फोटो असे म्हणत फोटो सभेतील जनसमुदायाला दाखवला.
तसेच पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, हे परळीतील कनेक्शन पाकिस्तानातील आंतकवादी संघटनेशी जोडले गेले नाही ना असा सवाल करत याची गृहविभागाने सखोल चौकशी करावी अशी मागणीही यावेळी केली.
पुढे टीका करताना सुरेश धस म्हणाले की, सत्तेच्या आडोशाला राहुन अफाट संपत्ती कमावणारी ही मुजोर गुंडशाही आहे. या गुंडाचे अन्याय सहनही केले असते. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने घडवून आणली. ते सर्व संतापजनक आहे. या हत्या प्रकरणातील आरोपींना मोक्का लावल्याचे समजले. मात्र यातील मास्टरमाईंड आणि खंडणीच्या आरोपात अटकेत असलेल्या गुन्हेगाराला मात्र मोक्का लावला नाही. याचे कारण समजले नाही. हा खून करणारा, आणि त्याचा कट रचणारा सगळ्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी करत त्यांना आता जर पाठीशी घातले तर भविष्यात दिवस उजडायच्या आधी मुडदे पडतील असा गर्भित इशाराही यावेळी दिला.