पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे धरायला हे काय तुमचे घर नाही. तुम्हाला जनतेची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे, त्यामुळे ही तुमच्या घराची स्टोरी नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, राज्य सरकारने आता कामाला लागायला हवे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे? किती गंभीर प्रश्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समोर आणि जनतेसमोर आहेत. यावर राज्य सरकार चर्चाच करत नाही. लोकांनी आपसात भांडण करण्यासाठी निवडून दिलेले नाही. तर सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी निवडून दिले आहे. कोण कुठला पालकमंत्री? कोणता विभाग कोणाला मिळाला? ही काय घरची स्टोरी नाही. ही देशाची आणि राज्याची सेवा असल्याचेही यावेळी सुणावले.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यातील महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, गुन्हेगारी या मुद्द्याला बगल देण्यासाठी पहाटेच्या शपथविधीवर चर्चा सत्ताधारी पक्षाकडून सुरू आहे. महाराष्ट्रात गुंतणूक वाढावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवून पोषक वातावरण तयार करावे असेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एका कुटुंबियांवर मुलीला एचआयव्ही झाल्याचे अपप्रचार करत त्या मुलीच्या कुटुंबियांवर बहिष्कार टाकण्यात आल्याच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अशा अफवा पसरवल्या जाऊ नये. एखाद्या व्यक्तीला एखादा आजार असेल तर त्या व्यक्तीला उपचार दिले पाहिजेत. अशा अफवा पसरवून कोणालाही वाळीत टाकू नये. कुठल्याही कारणामुळे एखाद्या कुटुंबावर अन्याय करू नये. त्याचबरोबर एड्स हा आजार वेगवेगळ्या कारणांनी पसरतो. त्यांना वाळीत टाकण्यापेक्षा अशा लोकांना आधार द्यायला हवा. समाजाने त्यांच्याबरोबर उभं राहायला हवं. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना एड्स आहे. त्यामुळे आपण खूप गांभीर्याने व संवेदनशीलपणे असे विषय हाताळले पाहिजेत असेही यावेळी सांगितले.
लाईव्ह 📍पुणे |पत्रकारांशी संवाद| 🗓️21-01-2025 https://t.co/YVFlTLdvdL
— Supriya Sule (@supriya_sule) January 21, 2025