आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणूकांना स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी केली. त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढविण्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मत व्यक्त केले. मात्र महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा आणि काँग्रेसची भूमिका पुढे आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनीही काहीशी शिवसेना उबाठाने घेतलेल्या भूमिकेशी मिळती-जुळती भूमिका मांडत मागील निवडणूकाही आम्ही निवडणूकाही वेगवेगळ्या लढवल्याचे सांगत यात नविन काय असा सवालही यावेळी केला.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगर पंचायतीच्या निवडणूका या यापूर्वीही स्वतंत्रच लढविल्या आहेत. त्याशिवाय कार्यकर्त्यांना संधी कशी मिळणार नाहीतर कार्यकर्त्यांनी पक्षाच्या संतरंज्याच उचलायच्या काय, त्यांना कधी न्याय मिळायचा असा प्रतिप्रश्न उपस्थितही यावेळी केला.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, आता सगळेच जण आपापल्या सोयीप्रमाणे लढत आहेत. वास्तविक पाहता या निवडणूका या कार्यकर्त्यांच्या निवडणूका आहेत. त्याही आपण जर आघाडी आणि युती म्हणून लढलो तर कार्यकर्त्यांना न्याय कधी मिळणार असा सवालही यावेळी केला.
दरम्यान, आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागील अनेक वर्षापासून युतीत असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका वेगवेगळ्या लढविल्या. तर तीच अवस्था भाजपा आणि शिवसेनेतही (पूर्वी आणि आताही) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या वेगवेगळ्याच लढविल्या गेल्या. फक्त काही अपवादात्मक जिल्ह्यांमध्ये किंवा शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत राज्यस्तरावरील युती-आघाडीत कायम ठेवण्यात आली. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत सर्वच राजकिय पक्षांकडून स्वतंत्र निवडणूका स्वबळावर लढविण्याची भूमिका वर्तविली जात आहे.