कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूकीत भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा पराभव करत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव या विजयी झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या तर हिमालयात जाईन या वक्तव्यावरून निशाणा साधला असून ते जर हिमालयात जाणार असतील तर मी ही त्यांच्यासोबत हिमालयात जाईन असा खोचक टोला लगावत पराभव एका मताने होवो किंवा हजारो मतांनी होवो पराभव हा पराभव असतो अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार यात्रेनिमित्त जयंत पाटील हे पुण्यात आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांनी त्यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी वरील टीका केली.
मी आज चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात आढावा घेण्यासाठी आलोय. त्यांनी कोल्हापूर मागेच सोडलंय, पण मी कोथरूडमधील कार्यकर्त्यांशी संवाद केला. त्यावरून चंद्रकांत पाटील यांना हाही मतदारसंघ सोडावा लागेल इतकं त्यांच्याविषयी प्रेम आपुलकी येथे दिसत असल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली.
पराभव एका मताने केला काय आणि हजार मतांनी केला काय, पराभव हा पराभव असतो. चंद्रकांत पाटलांना निवडणुकीला उभं राहण्याची संधी होती, पण असो. चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील, तर मीही जाईन. माझी देखील हिमालयात जाण्याची इच्छा आहे. चंद्रकांत पाटलांचे आणि माझे चांगले संबंध आहेत असे सांगत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.
कोल्हापूर पोटनिवडणुकीचा जसा तुम्हाला आनंद झाला आहे, तसा मला देखील झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकसंघ पद्धतीने काम केलं आहे. पुरोगामीत्वाकडे महाराष्ट्र झुकलेला आहे याचे हे द्योतक आहे. करवीरनगरीने दिलेला निकाल मार्गदर्शक आहे. राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक करतात. त्यांना या निकालाने चपराक मिळाली असल्याचेही ते म्हणाले.
