Breaking News

विधानसभा अध्यक्ष पदासाठी भाजपाच्या विरोधात मविआचा उमेदवार विधानसभेचे विशेष अधिवेशन ३ व ४ जुलै रोजी

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडाळीमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यानंतर भाजपाच्या पाठिंब्यावरील या शिंदे सरकारला ३ आणि ४ जुलै रोजी बहुमत सिध्द करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले. राज्यपालांनी विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रमही जाहिर केला आहे. या निवडणूकीसाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर या उमेदवारी दिली. आता राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार देण्यात येणार असल्याचे जाहिर केले.

त्यामुळे सत्ता गेल्यानंतरही महाविकास आघाडीकडून भाजपाला आव्हान देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार ३ जुलै आणि सोमवार, ४ जुलै, २०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवार, २ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवड रविवार, ३ जुलै रोजी सभागृहात होईल. विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी या विशेष अधिवेशनास उपस्थित रहावे, असे आवाहन विधानमंडळ सचिवालयाने केले आहे.

विरोधी पक्षाचे काम नक्कीच चांगले करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास जिंकू – जयंत पाटील

आता आम्ही विरोधी पक्षात बसलो आहोत तर विरोधी पक्षाचे काम नक्कीच चांगले करू आणि महाराष्ट्रातील जनतेचा पुन्हा एकदा विश्वास जिंकू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे प्रदेश कार्यालयात आले त्यावेळी माध्यमांशी बोलताना वरील माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेबांना आयकर विभागाची नोटीस आल्याचे आम्हाला देखील कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेनंतरच कळले. मागच्या चार निवडणुकीत पवारसाहेबांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्राची माहिती मागविण्यात आली आहे. पवारसाहेबांना नोटीस पाठविण्याऐवजी आयकर विभागाने जर निवडणूक आयोगाकडून ही माहिती घेतली असती तर त्यांना तिथून मिळाले असतीच, परंतु जाणीवपूर्वक यंत्रणांचा गैरवापर करुन प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांचा सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली.

महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्र होतो. यापुढेही विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आमचा एकच उमेदवार असणार आहे. सरकार गेल्यानंतर आम्ही एकत्र बसून चर्चा केलेली नाही, पुढील काळात एकत्र बसून पुढील धोरण ठरवू. स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत जिथे – जिथे शक्य होईल, तिथे तीनही पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न यशस्वी करु असेही त्यांनी सांगितले.

संजय राऊत यांना ईडीची नोटीस आली असून ते चौकशीला सामोरे गेलेले आहेत. ते निर्दोष असून त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही. आजच्या चौकशीच्या शेवटी ईडीचे दिल्लीतील अधिकारी काय निर्णय देतात हे पाहावे लागेल. कारण याआधी आमचे देखील नेते दिवसा चौकशीला गेल्यानंतर त्यांची रात्रीपर्यंत चौकशी चालली आणि रात्री उशीरा त्यांच्या अटकेच्या बातम्या येतात. त्यामुळे संजय राऊत यांच्याविरोधात ईडी जाणीवपूर्वक टोकाची भूमिका घेणार नाही, अशी अपेक्षा आपण करुयात ते म्हणाले.

Check Also

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *