Breaking News

उस्मानाबादमधील भाजपाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश… उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षात केले स्वागत

उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उस्मानाबाद येथील भाजपा नेते दिग्विजय शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी राजेंद्र झांबरे, मिलिंद कांबळे, डी. टी. कांबळे, आनंद पाटील, गोपाळ घोडके व इतर पदाधिकारी- कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश पार पडला.

दिग्विजय शिंदे यांचे पक्षात स्वागत करताना अजित पवार यांनी इतकी वर्षे एका पक्षात लोकसेवा करून त्यानंतर वेगळी भूमिका स्वीकारणे हे अवघड काम आहे. तरी देखील दिग्विजय शिंदे यांनी हे आव्हान स्वीकारले. उस्मानाबाद जिल्ह्यात पक्षाचे अनेक पदाधिकारी काम करतात, दिग्विजय शिंदे यांच्या येण्यामुळे पक्षाची ताकद अधिक वाढेल असा विश्वास व्यक्त केला.

आपल्या पक्षात कुठेही भेदभाव होत नाही. तुम्ही तुमचे कौशल्य दाखवले की त्यानुसार संधी मिळत असते. मराठवाड्यातील तरुण सहकारी धनंजय मुंडे यांनी पक्षात प्रवेश केल्यावर त्यांना आमदारकीची संधी मिळाली व पुढे काम करता आले. दिग्विजय शिंदे यांचेही भविष्य उज्ज्वल आहे, हा विश्वास आहे. तुम्ही उत्तम प्रकारे काम करून लोकांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ नये याची खबरदारी घ्या असे आवाहनही त्यांनी केले.

उस्मानाबाद जिल्हा हा शरद पवारांवर प्रेम करणारा जिल्हा आहे. जिल्ह्यातील विकासकामे करण्यासाठी आम्ही काही महत्त्वपूर्ण प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे. कृष्णा नदीचे पाणी इथे घेऊन येण्यासाठी होणारा प्रकल्पाचे जोमाने काम सुरू करण्यात येत आहे. आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पाणी पोहोचविण्याचा प्रयत्नात आहोत. यातून जो दुष्काळी भाग आहे. जो पाण्यापासून वंचित आहे त्यासाठी लवकरात लवकर पाणी मिळण्यासाठी प्रकल्पाला गती देण्याचे काम होईल. तसेच २०२४च्या अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

दिग्विजय शिंदे हा एक युवा नेता असून ज्यांने अनेक वर्षांपासून भाजपामध्ये काम केले आहे. सुशिक्षित पदवीधर आणि पक्ष संघटनेत बराच काळ काम केलेला नेता भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादीत येतोय, त्याबद्दल त्याचे स्वागतही जयंत पाटील यांनी केले.

दिग्विजय शिंदे यांची राजकीय कारकीर्द चढत्या क्रमाची आहे. कोरोना काळात लोकसेवा करण्याचे काम त्यांनी उत्साहाने केले. त्यांनी ठाम निर्धार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी त्यांच्या वडिलांपासून फारकत घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. पवारसाहेबांचा विचार पटल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. काम करणाऱ्या आणि योग्य जनाधार असलेल्या नेतृत्त्वाला अधिक प्रोत्साहन देण्याचे काम शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष करतोय. उस्मानाबाद जिल्ह्यात आम्हाला पक्ष वाढवायचा आहे. तुम्हा सर्वांच्या येण्याने उस्मानाबाद जिल्ह्यात पक्षाला अधिक ताकद मिळाली आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्कमंत्री तथा राज्यमंत्री संजय बनसोडे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी आमदार राहुल मोटे तसेच पक्षाचे उस्मानाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *