Breaking News

नाना पटोले म्हणाले, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर व भारनियमनावर शरद पवार यांच्याशी चर्चा आयएनएस ‘विक्रांत’चे पैसे गेले कुठे, याचे भाजपाने उत्तर द्यावे

कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यावर विजेचे संकट ओढवले असून केंद्र सरकारकडून जाणीवपूर्वक पुरेसा कोळसा पुरवठा केला जात नाही. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर कारवाया केल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे, या विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती काँग्रेसप्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
खासदार शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात विजेची मागणी वाढलेली असताना केंद्र सरकारकडून राज्याला पुरेसा कोळशा पुरवठा केला जात नाही परिणामी राज्यावर लोडशेडींग करण्याची वेळ आली आहे. हा विषय तातडीने मार्गी लावण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या अडवणुकीमुळे राज्य अंधारात जाण्याचा धोका आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने राजकीय सूडबुद्धीतून कारवाई केली जात आहे. केंद्र सरकार दबाव बनवून महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. पण केंद्र सरकारची ही मनमानी जास्त दिवस चालणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणामार्फत जेंव्हा मविआ नेत्यांवर कारवाई केली जाते तेव्हा ‘कर नाही तर डर कशाला?’ असे म्हणणारे भाजपा नेते प्रविण दरेकर व इतर भाजपा नेत्यांवर राज्यातील यंत्रणा कारवाई करतात तेंव्हा आकांडतांडव का करतात ? असा सवाल उपस्थित केला.
केंद्र सरकारकडून राज्याला दिली जात असलेली सापत्नभावाची वागणूक व राज्याला भेडसावणाऱ्या महत्वाच्या विषयावर शरद पवार यांच्याशी चर्चा केली. या सर्व विषयांवर दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून चर्चा करतील असेही त्यांनी सांगितले.
‘आयएनएस विक्रांत’बद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी ‘सेव्ह विक्रांत’ अभियान राबवण्यात आले होते. यावेळी जमा केलेला पैसा कुठे गेला हा प्रश्न विचारला जात आहे, तो रास्तच आहे. तो पैसा राजभवनला पाठवल्याचे सांगितले जात होते पण राजभवननेच असा कोणताही निधी मिळाला नाही असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा पैसा कुठे गेला याचे उत्तर भाजपाने जनतेला दिले पाहिजे. परंतु भाजपा जाणीवपूर्वक विषयाला बगल देत आहे. विक्रांतसाठी जमा केलेला पैशाचा व्यवहार कोणत्या बँकेतून झाला हे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे, या सर्वांचा खुलासा करून त्या पैशाचे काय झाले समजले पाहिजे अशी मागणीही केली.

Check Also

आमदार बच्चू कडू यांनी उध्दव ठाकरे यांचे कौतुक करत केली टीका मंत्री पदाच्या मागणीवर ठाम असल्याचा पुर्नरूच्चार

केंद्रीय गृहमंत्री खरं बोलतात की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरे बोलतात हा संशोधनाचा विषय आहे …

Leave a Reply

Your email address will not be published.