Breaking News

नाना पटोलेंचा सवाल, देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल? कोळसा आयातीचा केंद्रीय मंत्र्यांचा सल्ला भाजपच्या मित्रांच्या फायद्यासाठी

अखंड भारताचे स्वप्न पुढील १०-१५ वर्षात पूर्ण होईल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य नवे नसून आरएसएसचा तोच अजेंडा आहे. केंद्रात आरएसएसच्या विचाराचे सरकार आल्यापासून देशभर विष कालवून समाज तोडण्याचे काम सुरु आहे अशा पद्धतीने देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड भारताबद्दल केलेल्या विधानाचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. आरएसएसची विचारधारा तोडणारी आहे, यातूनच सामाजिक वातावरण बिघडवण्याचे काम केले जाते. त्यासाठी सातत्याने धर्मा-धर्मात वाद निर्माण करणारे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. केंद्रात त्यांच्याच विचारांचे सरकार असल्याने समाजात विद्वेष पसरवणाऱ्या घटनांना बळ मिळत आहे. परंतु अखंड भारताचे स्वप्न बाळगणाऱ्या आरएसएसने या अखंड भारताचे व्हिजन काय? अखंड भारतात कोणत्या-कोणत्या धर्माला, जातींना स्थान असेल हे स्पष्ट करायला हवे अशी मागणीही त्यांनी केली. 

वीज समस्येवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्र सरकारकडून कोळसा पुरवठा होत नसल्याने वीजेचे संकट ओढवले आहे. त्यावर केंद्रीय कोळसामंत्र्यांनी विदेशातून कोळसा आयात करण्याचा सल्ला दिला आहे. कोळसा आयात केला तर त्याचा फायदा भाजपाच्या काही उद्योगपती मित्रांनाच होणार आहे. परंतु कोळसा आयात केल्याने वीज महाग होऊन त्याचा भुर्दंड मात्र सामान्य वीज ग्राहकांना सोसावा लागेल. केंद्रात डॉ. मनमोहन सिंह सरकार होते, तेव्हा कोळसा खाणीत भ्रष्टाचार झाला असे आरोप करण्यात आले. पण नंतर ते खोटे ठरले. परंतु मनमोहनसिंह यांच्याकडे व्हिजन होते, कोळसा खाणीतून उर्जा विभागाला सशक्त करण्याची तयारी होती. तसे व्हिजन मोदी सरकारकडे नसून मोदी सरकारच्या काळात एकही नवी कोळसा खाण झाली नाही, यामागे खाजगीकरणाचा डाव आहे, केंद्र सरकारच्या मित्रांना वीज प्रकल्प मिळावेत याकरता हा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला.  

मशिदीवरील लाऊड स्पिकरचा मुद्दा उपस्थित करून काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजण्याचे काम करत आहेत. सर्वच धर्मामध्ये लाऊडस्पिकर वापरला जात असताना एकाच धर्माला टार्गेट का केले जात आहे? असा सवाल करत संविधान कोणत्याही धर्माचा द्वेष करायला सांगत नाही. धर्माच्या ठेकेदारांनी आगीत तेल ओतण्याचे काम करू नये असा इशारा देत महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करणाच्या प्रयत्न सुरु आहे. मात्र कोणीही असले तरी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. खासदार राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मुंबई दौ-यात ते काँग्रेसचे आमदार, मंत्री व पक्ष पदाधिका-यांना भेटतील. महाराष्ट्रातील कॉमन मिनिमम प्रोग्राम, महाविकास आघाडी सरकारमधील समन्वय यासाठी राहुल गांधी यांचा हा दौरा महत्वपूर्ण असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Check Also

भाजपाचे शरद पवार यांना प्रत्युत्तर,… संविधान बदलाच्या अफवा

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *