Breaking News

विरोधकांच्या “त्या” वक्तव्यावरील टीकेनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, जर मी… नाना लढले तर तुम्हाला फेस आला जर मी लढलो असतो तर

कोल्हापूरातील पोट निवडणूकीत काहीही करून काँग्रेसच्या ताब्यातील जागा हिसकावून घ्यायचीच असा चंग बांधून कोल्हापूरात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे ठाण मांडून बसले होते. तरीही भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सध्या चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्याची चर्चा सुरु झाली असून त्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आता हिमालयात जा अशी उपरोधिक टीका सुरू झाली आहे. टीकेचा वाढता रोख लक्षात घेवून यावर आता चंद्रकांत पाटील यांनीच स्पष्टीकरण दिले.

कोल्हापुरात प्रचारादरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हिमालयाच्या मुद्द्यावरच चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. दोनच दिवसांपूर्वी इथल्या मंगळवार पेठेत चंद्रकांत पाटील प्रचारासाठी पोहोचले असता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि जिजाऊ यांच्या नावाचा यावेळी जयघोष करण्यात आला. ‘दादा हिमालयात जावा’ अशीही घोषणा यावेळी तरुण देत होते. अखेर कार्यकर्त्यांचा हा संताप पाहून चंद्रकांत पाटील यांनी समर्थकांसोबत तिथून काढता पाय घेतला होता.

दरम्यान, या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खोचक शब्दांत ट्वीट करत चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलेल्या मीममध्ये चंद्रकांत पाटील मांडी घालून आणि डोळे मिटून बसल्याचं दिसत आहे. तो फोटो मॉर्फ्ड करून त्याच्या पार्श्वभूमीवर हिमालयाचा फोटो लावण्यात आला आहे. सोबत बॉक्समध्ये ‘मी पोहोचलो रे हिमालयात’ असं वाक्य लिहिलं आहे. हे ट्वीट शेअर करताना जितेंद्र आव्हाडांनी “नको, परत या”, अशी खोचक टिप्पणी केली.

आपल्या हिमालयात जाण्यासंदर्भातल्या विधानाची चर्चा सुरू असल्याचं पाहून कोल्हापूर निवडणुकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी या मुद्द्यावर खुलासा करताना म्हणाले की, आमचे नाना कदम लढले, तर तुमच्या तोंडाला फेस आला. मग मी लढलो तर काय होईल? मी असं म्हटलं होतं की मी लढलो आणि जिंकलो नाही तर मी हिमालयात जाईन. मी लढलोच नाही ना. नानाच लढले. अक्षरश: फेस आला तुमच्या तोंडाला. इथे तर कमी मतांनी विजय आहे असे सांगत विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांनी २०१९ साली झालेली विधानसभा निवडणूक पुण्याच्या कोथरूडमधून जिंकली होती. पण तेव्हा पाटील कोल्हापुरातून पळून आल्याची टीका विरोधकांनी केली होती. त्यावेळी कोल्हापूरमधून कधीही निवडणूक लढवण्यासाठी मी तयार आहे, जर तिथून हरलो, तर हिमालयात निघून जाईन, असं विधान केलं होतं. त्याच वक्तव्याचा धागा पकडून विरोधकांकडून सध्या टीका करण्यात येत आहे.

Check Also

शिंदे गटाला टोला लगावत उध्दव ठाकरे म्हणाले, टेंम्पो-ट्रक कमी पडले पाहिजेत… निवडणूक आयोगासमोर सादर करण्यासाठी शपथपत्र आणि सदस्य पत्र वाढविण्याचे आव्हान

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीचे काम …

Leave a Reply

Your email address will not be published.