Breaking News

पराभवनानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, मताधिक्य जास्त नाही हुरळून जावू नका कोल्हापूर उत्तर मतदारसंघात जनतेचा कौल मान्य

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निकालाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, सत्ताधारी महाविकास आघाडीचे तीन पक्ष विरुद्ध एकटा भाजपा अशी अटीतटीची निवडणूक झाली. परंतु, काँग्रेसच्या उमेदवाराचे मताधिक्य जास्त नाही. त्यामुळे कोणी हुरळून जाऊ नये असा इशारा देत या निवडणुकीत भाजपाची मते वाढली आहेत आणि निवडणुकीच्या निमित्ताने गल्लोगल्ली चांगले कार्यकर्ते उभे राहिले आहेत असेही ते म्हणाले.

जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची मते ४१ हजारांवरून वाढून ७८ हजार झाली असून जनाधार वाढविण्यासाठी अधिक काय करावे याचा विचार पक्ष करेल असेही त्यांनी सांगितले.

राज्यात भाजपाचे सरकार नाही. भाजपाच्या विरोधात दडपशाही, दंडुकेशाही, पैसा व जातीच्या कार्डचा वापर करण्यात आला. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांच्या अंगावर धाऊन जाण्यापर्यंत दडपशाही झाल्याचा आरोप त्यांनी केला.

तथापि, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही दडपशाहीला न घाबरता काम केले. भाजपाची मते ४१ हजारांवरून ७८ हजारांपर्यंत वाढली. ही फार मोठी प्रगती असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपाने ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढली. हिंदुत्व हा काही भाजपाचा निवडणुकीचा अथवा राजकारणाचा मुद्दा नाही तर हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे. आम्ही आमची हिंदुत्वाची भूमिका कधीच लपवली नसल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान उत्तर कोल्हापूरच्या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७ हजार मते मिळाली. तर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना ९६ हजार मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार जाधव या विजयी ठरल्या. मात्र या निवडणूकीच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांचे घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरात अद्यापही त्यांच्या भाजपामधील नेतृत्वाला अद्याप मान्यता मिळून येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाकडून स्थानिक पातळीवर हात-पाय पसरण्यासाठी राष्ट्रवादीतील धनंजय महाडीक, संग्रामसिंग घाटगे आदींना पक्षात स्थान दिले. मात्र तरीही भाजपाची कोल्हापूरात वाढ होताना आणि चंद्रकांत पाटील यांना स्थान मिळताना दिसून येत नसल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *