Breaking News

मनी लॉंड्रींगप्रकरणी संशयित अनिल देशमुखांना ५ दिवसांची कोठडी घरच्यांना भेटणे आणि जेवण देण्यास न्यायालयाची परवानगी :वकिलांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

१०० कोटी रूपयांची वसूली करण्यास गृहमंत्री देशमुख यांनी सांगितल्याचा खळबळजनक आरोप करत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजविणारे आयपीएस अधिकारी परमबीर सिंग हे गायब झालेले असताना याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीसाठी काल अचानक ईडी कार्यालयात हजेरी लावली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री उशीरापर्यत त्यांची चौकशी करून मनी लॉड्रींगप्रकरणी अटक केली. आज त्यांना विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती देशमुख याच्या वकीलांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली.

ईडीने देशमुख यांच्या चौकशीसाठी १४ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र देशमुखांच्या वकीलांनी त्यास विरोध केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची अर्थात ६ नोव्हेंबर पर्यत कोठडी दिली.

तसेच यावेळी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात ईडीने अनिल देशमुख यांना आरोपी म्हणून नव्हे तर संशयित म्हणून  चौकशीसाठी बोलावित असल्याचे स्पष्ट केल्याची आठवण करून देत आताची अटक कोणत्या कारणासाठी करण्यात आली याचे माहिती ईडीला विचारली असता ईडीने त्यांना संशयित म्हणून अटक करण्यात आल्याचे न्यायालयात स्पष्ट केल्याची माहितीही देशमुखांच्या वकीलांनी सांगितले.

अनिल देशमुख यांचे वय ७२ असून त्यांना हायपर टेन्शन आणि इतर व्याधींचा त्रास असून त्यांना घरच्यांना भेट घेण्याची आणि घरचे जेवण देण्याची मुभा असावी अशी मागणी न्यायालयात करण्यात आली. त्यावर न्यायालयाने देशमुख यांना घरचे जेवण देण्यास आणि घरच्यांना भेटण्यास परवानगी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच चौकशीच्यावेळी देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील सोबत रहावी अशी मागणीही न्यायालयात करण्यात आली होती. त्यासही न्यायालयाने परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. ईडीने अनिल देशमुखांना मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली.

अनिल देशमुखांना अटक करण्यात आलेले मनी लाँड्रिंग प्रकरण महाराष्ट्र पोलीस आस्थापनातील एका कथित खंडणी टोळीशी संबंधित आहे. देशमुख यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अटक करण्यात आली आहे, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. देशमुख यांनी चौकशी दरम्यान प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले, असा दावा त्यांनी केला. ईडीने देशमुख यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले आणि १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयात एजन्सीच्या वतीने युक्तिवाद केला. त्याआधी अनिल देशमुख यांना सोमवारी रात्री उशिरा संचालनालयाने सुमारे १३ तासांच्या चौकशीनंतर अटक केली. मंगळवारी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले होते.

Check Also

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला, “आभासी उपस्थिती असली तरी पाठिंबा प्रत्यक्षच” निर्भया पथकाच्या धून उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे विरोधकांवर पलटवार

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाची दुसऱ्याकडे द्या असा खोचल सल्ला विरोधकांकडून मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *