Breaking News

सुरज जाधव याच्या आत्महत्येतून ऊर्जा मंत्रालय धडा घेणार का ? आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील सुरज जाधव या तरूण शेतकऱ्यांने शेतकऱ्यांच्या जन्माला पुन्हा येणार नाही असे म्हणत आपलं जीवन संपवले. या दुर्घटनेनंतर भाजपा आमदार तथा राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या ऊर्जा विभागावर टीका करत वीज तोडणी, जादा वीजबिल आकारणीला कंटाळून पंढरपुरातील तरुण शेतकऱ्याने जीवन संपविले. शेतकऱ्यांच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही, असं सुरज मृत्यूपूर्वी म्हणाला होता. या दुर्दैवी घटनेतून महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्रालय काही धडा घेणार आहे का? ऊर्जा मंत्रालयाकडून राज्यातील शेतकऱ्यांचा चाललेला छळ आता तरी थांबणार का? असा सवाल उपस्थित केला.

महाविकास आघाडीत वाटेदार असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीने निवडणुकीपूर्वी भले मोठे आश्वासनं दिले होती. दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी मिळेल, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करू, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊ, ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी मिळेल, शेतकरी आत्महत्या थांबतील अशा आश्वासनांचा त्यात समावेश होता. पण, राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही कमी झालेल्या नाहीत, २०२० मध्ये महाराष्ट्रात एकूण २ हजार ५७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२१ या ११ महिन्यांत काळात २ हजार २०७० शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे. आता तर चक्क वीज तोडणीला कंटाळून सुरज जाधवने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. ऊर्जा मंत्रालयाने तात्काळ हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे. वीज तोडणी थांबवावी, मागणीही त्यांनी यावेळी केली.

महावितरण कर्जबाजारी झाल्याचे सांगत राज्यात १६ विभागाअंतर्गत ४४ सर्कल अधिकाऱ्यांना थकबाकी वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी वेठीस धरला जातोय. सततचा दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, गडगडलेले शेतमालाचे दर, एकरकमी एफआरपीसाठी संघर्ष, दुधाचा घसरलेला दर, जनावरांचा चारा, शेतीची मशागत अशा चहुबाजूनी राज्यातील बळीराजा अडचणीत सापडला असून, स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी व मुलांच्या भविष्यासाठी तो दिवसरात्र झगडतोय. तरीही, शेतातील पिकाला पाण्याची जोड मिळाल्यास त्याला या संकटातून बाहेर निघण्यास मदतच होणार आहे. ऊर्जा मंत्रालयाने तात्काळ यात लक्ष घालण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सुरज जाधवने आत्महत्या का केली?

फेसबुक लाइव्ह सुरु असताना तरूण शेतकरी सुरज जाधव याने विषप्राशन करुन आत्महत्या केली. राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी पंढरपूरमधील मगरवाडीमधील सूरज जाधवने हे टोकाचं पाऊल उचलले. शुक्रवारी सायंकाळी सूरजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

२६ वर्षीय सूरजचा कीटकनाशक पितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये सूरज पुन्हा जन्म मिळालाच तर शेतकरी म्हणून मिळू नये असे सांगताना दिसतोय. “माझं आयुष्य इतकच होतं. मला पुन्हा शेतकरी म्हणून जन्म घ्यायचा नाहीय, कारण शेतकरी हा असमर्थ, दुबळा असतो,” असे सूरज या व्हिडीओत म्हणताना दिसतोय. सूरजने या व्हिडीओमध्ये कीटकनाशकाची बाटली दाताने उघडली आणि तोंडाला लावली. त्यापूर्वी त्याने सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही असा आरोपही केला.

या प्रकारानंतर सूरजला पंढरपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी सूरजचा मृत्यू झाला. तालुक्याच्या पोलीस स्थानकातील पोलीस निरिक्षक मिलिंद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सूरजच्या मालकीची १.१५ एकर जमीन आहे. त्याचे कोणतेही थकित वीज बीलही नव्हतं तरी त्याने का आत्महत्या केली याचा पोलीस शोध घेत आहेत. मागील काही दिवसांपासून थकित वीजबिलांच्या कारणांवरुन शेतकरी आणि वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीमधील संघर्ष या पट्ट्यामध्ये तीव्र झाल्याचं दिसत आहेत. काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार वीज कंपनीने त्याच्या घराचा वीजपुरवठा खंडित केला होता. मात्र मागील काही दिवसांमध्ये या गावातील एकाही शेतकऱ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *