Breaking News

संजय राऊत म्हणाले; कोणीही असो, आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही शिवसेनेचा उमेदवार देऊन निवडूण आणू

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांना शिवसेनेत आल्यानंतर उमेदवारी जाहिर करण्याची अट शिवसेनेकडून घालण्यात आली. मात्र त्याऐवजी संभाजी राजे यांनी शिवसेनेऐवजी आपणास महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जाहिर करा अशी अट घातली. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निमंत्रणानंतरही त्यांनी वर्षा बंगल्यावर जाण्याऐवजी कोल्हापूरला जाणे पसंत केले. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट घातली असली तरी शिवसेनेत प्रवेश करण्याची संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. पण त्यांच्याकडे मते असल्यानेच ते निवडणूकीच्या रिंगणात उतरत आहेत. परंतु ते आमच्याकडे मतं मागत आहेत. ती मते आम्ही कशी देणार असा सवाल करत आता शिवसेना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका शिवसेनेची असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील भूमिका स्पष्ट केली.
अनेक वर्षे शिवसेना राजकारणात आहे आणि महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. सहा जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यातील दोन जागा शिवसेना लढत आहे. त्यातील दोन्ही ठिकाणी आम्ही शिवसेनेचे उमेदवार देऊ आणि निवडून आणू ही शिवसेनेची भूमिका आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. ज्या अर्थी एखादा उमेदवार निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करतो तेव्हा त्यांच्याकडे निवडूण येण्यासाठी लागणाऱ्या मतांची व्यवस्था त्यांनी केलेली असते. यासाठी ४२ मते लागतात. संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्याअर्थी त्यांच्याकडे ४२ मते आहेत. अशा वेळी आम्ही त्यामध्ये पडणे गरजेचे नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पण असं लक्षात येत आहे की त्यांच्याकडे मते नाहीत. त्यांनी आमच्याकडे मते मागितली पण आम्ही कशी मते देणार? आम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आहे अपक्ष नाही. आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. मग ते कोणीही असो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आम्ही त्यांना शिवसेनेत यायला सांगितले आणि उमेदवारी घ्या असे सांगितले. राज्यसभेत शिवसेनेचा एक खासदार वाढवणे आम्हाला गरजेचे आहे. तुम्ही छत्रपती आहात त्यामुळे एक पाऊल पुढे या आम्ही दोन पावले मागे जाऊ. आता निर्णय त्यांचा आहे. मी उद्धव ठाकरेंच्या वतीने सांगत आहे की कोणत्याही परिस्थिती दोन उमेदवार हे शिवसेनेचेच निवडून जातील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचे जाहीर केलेले कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश करावा. त्यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप संभाजीराजे यांना देण्यात आला होता. शिवसेनेच्या एका मंत्र्याने संभाजीराजे यांची भेटही घेतली. संभाजीराजे हे शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार नाहीत. याउलट महाविकास आघाडीकडील अतिरिक्त मते आपल्याला द्यावीत, असा प्रस्ताव त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीकडे दिला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही ३१ तारखेपर्यंत आहे.
राज्यसभेच्या सहापैकी दोन जागा लढविण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. एका जागेवर संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. भाजपाच्या वतीने सहा वर्षांपूर्वी राज्यसभेवर संभाजीराजे यांची नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हाही संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणूनच सहा वर्षे खासदारकी भूषविली. या वेळीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *