पत्रावाला चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर आज राज्यसभेत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावावर गोळा केलेल्या निधीवरून राज्यसभा बंद पाडली. तसेच संसदेचे अधिवेशनही अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर संजय राऊत मुंबईत परतल्यानंतर म्हणाले की, होय मी शरद पवारांचा माणूस आहे हे काय आता लपून राहीलेय का? शिवसेनेत असलो तरी माझे त्यांच्याशी घनिष्ठ संबध असल्याचे त्यांनी सांगितले.
म्हणून तर राज्यातील हे सरकार मी आणू शकलो ना? झालेल्या कारवाईचे त्यांना फार दुःख झाले असल्याने काल ते माझ्यासाठी पंतप्रधानांना भेटल्याचेही त्यांनी सांगितले.
किरीट सोमय्यांनी त्यांवर करण्यात आलेल्या आरोपाचे पुरावे मागितल्याबाबत प्रसारमाध्यमांनी राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, तो माणूस काय पुरावे मागतोय. स्पष्ट दिसतेय पैसे गोळा केलेत. पैसे गोळा करतोय, पैसे घेण्याचं आवाहन करतोय. त्याने ७११ डबे फिरवले. ते भरेपर्यंत फिरवले. ते डबे मुलुंडला नीलम नगरला गेले. त्यातले अर्धे डबे जुहूला एका कार्यालयात गेले. ते पैसे बाहेर काढले. पीएमसी बँकेच्या माध्यमातून बंदे केले. आर्थिक घोटाळा केला. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी, ते पैसे राजभवनात जमा करू असं त्यांचे धोरण होते अशी माहिती दिली.
ही माहिती त्यांच्याच माणसांनी आम्हाला दिलीय. त्यांची माणसे बसलीयत ना तिकडे राजभवनावर ती काय शिवसेनेची शाखा थोडीच आहे. राजभवन ही तर भाजपाची शाखा आहे. राज्यपाल त्याचे शाखाप्रमुख आहेत. त्यांनीच पत्र दिलंय मला की हे कोट्यवधी रुपये जमा झालेत, ते आमच्याकडे आलेच नाहीत. या मधल्या काळात ते पैसे कुठे गेले? हे मी तुम्हाला सांगितलं. आता यापेक्षा काय पुरावा असतो, ते या मूर्ख माणसानं सांगावं अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
राजभवनातूनच हे पुरावे आले आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती देशद्रोहाच्याच गुन्ह्याएवढी आहे. देशभरातून किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाने पैसे गोळा केले आहेत. त्यामुळे सेव्ह आयएनएस विक्रांत घोटाळ्याविरुद्ध देशभरात गुन्हे दाखल होत आहेत. राज्यसभाही आज या विषयावर बंद पडल्याचे त्यांनी सांगितले.
