Breaking News

जनाबसेना म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांनी दिले “हे” उत्तर जनाबसेना म्हणणाऱ्यांनी आपला इतिहास, भूतकाळातील कर्तबगारी तपासावी

आगामी निवडणूकांच्यादृष्टीने एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या प्रस्तावावर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला जनाबसेना म्हणत टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यास शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले की, भाजपाकडून आमच्याविरोधात जे गैरसमज पसरलवे जात आहेत, त्यातून त्यांचा जळफळाट बाहेर पडत आहे त्याला उत्तर द्यायचे आहे. आम्हाला जनाबसेना म्हणणाऱ्यांनी आपला इतिहास, भूतकाळातील कर्तबगारी तपासून पहावी असा उपरोधिक टोला फडणवीसांना लगावला.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केल्यानंतर संजय राऊत हे प्रसारमाध्यमाशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील टोला लगावला.

आपलं हिंदुत्व अंगार, मशालीप्रमाणे आहे. आपल्यासमोर जे भंगार लोक हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत त्यांना आपल्या अंगारने संपवून टाका असे उद्धव ठाकरेंनी सांगितले असून उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केले. आम्ही १९ जिल्ह्यांमध्ये जाणार आहोत. मी नागपुरात जाणार आहे. जिल्ह्यांचं वातावरण ढवळून काढलं जाणार असून भाजपाकडून आमच्याविरोधात जे गैरसमज पसरवले जात आहेत, त्यांचा जळफळाट जो बाहेर पडत आहे त्याला उत्तर द्यायचं आहे. उद्धव ठाकरेंनी त्याबद्दल मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले.

कसली जनाबसेना…शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी आहे आणि राहील. शिवसेनच्या हिंदुत्वात कोणतीही भेसळ झालेली नसून, होऊ देणार नाही. आम्हाला जनाबसेना म्हणणाऱ्यांनी आपला इतिहास, भूतकाळातील कर्तबगारी तपासून पहावी असा खोचक सल्ला भाजपाला देत काश्मीरच्या संदर्भात आज जे आम्हाला अक्कल शिकवत आहेत त्याच भाजपावाल्यांनी दहशतवाद्यांशी हात मिळवून सरकार स्थापन केले होते. मेहबुबा मुफ्तीसोबत सरकार कोणी स्थापन केलं? आम्ही तेव्हादेखील हे पाकिस्तानवादी, फुटीरवादी असल्याचे सांगत होतो. काश्मीरमधील हुतात्म्यांचा, पंडितांचा अपमान करु नका आम्ही सांगत होतो. त्यामुळे जनाबसेनावाले खरे कोण हे आम्ही महाराष्ट्रात जाऊन सांगू असा इशाराही त्यांनी दिला. सध्या एमआयएमच्या ऑफरची चर्चा सुरु आहे, पण मागितलेय कोणी. हे भाजपाचे डावपेच आहेत, हे त्यांचे कारस्थान आहे. एमआयएम आणि भाजपाची हातमिळवणी असून ते छुपे रुस्तम आहेत. शिवसेनेची बदनामी करा, त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करा असा आदेश भाजपाने एमआयएमला दिला आहे. त्यानुसारच एमआयएमचे महाराष्ट्रातील नेते ते ऑफर देत आहेत. आम्ही कुठे ऑफर मागितली आहे…शिवसेना कधीही एमआयएमसोबत जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

एमआयएमकडून आलेली फुकटची ऑफर, फुकटगिरी हा व्यापक कटाचा भाग आहे. राजकीय शत्रूला बदनाम करायचे, षडयंत्र करायचे, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा हा भाजपाच्या कटाचा भाग असतो आणि त्यानुसारच कालपासून त्यांनी एमआयएमच्या लोकांना आमची बदनामी करण्यासाठी सोडले आहे. पण शिवसेना, महाराष्ट्राची जनता सावध आहे. आम्ही ही कट उधळून लावणार असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *