आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी आणि त्यासंदर्भातील एसआयडी (अर्थात राज्य गुप्तचर विभाग) चा अहवाल फोडल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासाचा भाग आणि याशी संबधित म्हणून २४ साक्षीदारांचा जबाब घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचा जबाब घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी नोटीस पाठविली. परंतु फडणवीस आणि भाजपाकडून करण्यात येत असलेल्या स्टंटबाजीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी खोचक सवाल करत मग हा तमाशा का? असा सवाल ट्विटच्या माध्यमातून केला.
या नोटीशीवरून फडणवीस यांनी काल शनिवारी पत्रकार परिषद घेत जबाब देण्यासाठी आज सकाळी ११ वाजता बीकेसीतील सायबर पोलिस ठाण्याला जाणार असल्याचे जाहीर केले. मात्र त्यानंतर काही वेळाने सुत्रे हालल्यानंतर मुंबई पोलिसांनीच त्यांच्या घरी येवून जबाब घेण्यात येणार असल्याचे कळविले. त्यानुसार आज सकाळी मुंबई पोलिस त्यांच्या फडणवीस यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर गेले आणि जवळपास दोन तास त्यांचा जबाब नोंदविण्याचे काम केले.
दरम्यानच्या काळात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात फडणवीसांना पाठविलेल्या नोटीशीची होळी केली. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन केले. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत हे ट्विट करत म्हणाले की, कमाल आहे ! काही लोक व काही राजकिय पक्ष स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधींना राजकिय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले..लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळेच समान आहेत. असे ट्विट करत मग हा तमाशा का? असा खोचक सवाल केला.
एकदंरीतच नोटीसीवरून देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने चांगलीच राजकिय स्टंटबाजी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उद्या विधिमंडळ अर्थसंकल्पिय अधिवेशनात याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच फडणवीस यांनीच आरोप केलेल्या सरकारी वकील प्रविण चव्हाण खळबळजनक व्हिडिओ प्रकरणी उद्या गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे उत्तर देणार आहेत. तत्पूर्वीच हे नोटीशी नाट्य सुरु झाले. त्यामुळे दिवसभरात गृहमंत्री त्या प्रकरणी उत्तर देणार की नाही हे याचे उत्तर उद्याच कळेल.
कमाल आहे!
काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत?
महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?— Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2022