Breaking News

संजय राऊत यांचे आव्हान; एकनाथ शिंदेंची वेळ संपली, आता आमची वेळ सुरू महाविकास आघाडीचे सरकार मजबूत

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा रोवल्यानंतर हे बंड क्षमविण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांना परतण्याचे आवाहन केले. मात्र बंडखोर आमदारांकडून परतीच्या अनुषंगाने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांची वेळ संपली आता आमची वेळ सुरु असा अखेरचा इशारा देत बंडखोरांना आव्हान दिले.

आम्ही त्यांच्या प्रतिसादाची वाट बघितली. त्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आता एकनाथ शिंदेंची वेळ संपली असून आमची वेळ सुरू झाली आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राऊत प्रसार माध्यमांशी बोलत होते. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, शिवसेना सचिव अनिल देसाई उपस्थित होते.

अब हार नही मानेंगे, आता आमची वेळ आहे. महाविकास आघाडीचे सरकार मजबूत आहे. पुढची अडीच वर्ष आमचेच सरकार कायम रहाणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. शिंदेंना दिलेली वेळ निघून गेली आहे. लढाई रस्त्यावर झाली तरीही आम्हीच जिंकू, असे थेट आव्हान संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना दिले. त्यामुळे महाविकास आघाडी आणि शिवसेनाही बंडखोर आमदारांविरुध्द आक्रमक झाली आहे.

माझी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांच्याशी चर्चा झाली. आम्ही पूर्ण तयारी केली आहे. महाविकास आघाडी मजबूत आहे. आमचे महाविकास आघाडी सरकार पुढील अडीच वर्ष पूर्ण करेल आणि पुन्हा देखील सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीने आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन करुन सांगतो, आम्हाला हार मान्य नाही. आम्हीच जिंकणार. विधिंमंडळात देखील आम्हीच जिंकू असेही ते यावेळी म्हणाले.
शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत रणनीती ठरल्यानंतर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना आमचा सामना करायचा आहे, त्यांनी मुंबईत येऊन आमच्याशी सामना करावा, असा इशारा दिला.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड करून काही आमदारांनी अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यांना आम्ही चर्चा करण्याची संधी दिली होती. आता मात्र वेळ निघून गेली आहे. त्यामुळे आम्ही आता लढायला तयार आहोत. यशवंतराव चव्हाण सेंटर याच इमारतीमधून महाविकास आघाडीची घोषणा झाली होती. याच इमारतीत महायुतीचे बंधन बांधण्यात आले. आता याच इमारतीमधून मी सांगत आहे की, महाविकास आघाडी मजबूत आहे आणि हे सरकार पुढील अडीच वर्ष पूर्ण करेल. तसेच २०२४ साली देखील हेच सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा ठाम विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *