Breaking News

संजय राऊत यांचा सूचक इशारा, ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी… राज्यसभेच्या निकालानंतर संजय राऊतांचा भाजपावर आरोप

राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार आणि भाजपाचे उमेदवार धनंजय महाडीक यांच्यात थेट लढत होत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. तर भाजपाचे तीन तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडूण आला. तसेच या निवडणूकीत महाविकास आघाडीकडच्या काही अपक्षांची मते फुटली त्यामुळे भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपावर जोरदार हल्ला चढवला.

या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा दावा संजय राऊत यांनी करत बाजारातले काही घोडे विकले गेले. मला वाटतंय जास्त बोली लागली. किंवा इतर काही कारणं असतील. त्यामुळे आमची अपक्षांची ६ मतं आम्हाला मिळाली नाहीत. असे लोक कुणाचेच नसतात. पण आमचे घटक पक्ष, छोटे पक्ष यांचं एकही मत फुटलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बच्चू कडू, शंकरराव गडाख, यड्रावकर किंवा इतर अशी मतं आम्हाला मिळाली आहेत. फक्त घोडे बाजारात जे लोक उभे होते, त्यांची ६-७ मतं आम्हाला मिळवू शकलो नाही. आम्ही व्यापार न करताही संजय पवारांना पहिल्या पसंतीची ३३ मतं मिळाली हाही आमचा विजयच आहे.

ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली, त्यांची नावं आमच्याकडे आहेत. आम्हाला माहितीये कुणी आम्हाला मतं दिलेली नाहीत. ठीक आहे. पाहुयात अशा शब्दांत त्यांनी सूचक इशारा दिला.

सुहास कांदेंचं मत बाद का झालं, हा संशोधनाचा विषय असल्याचे सांगत नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या मतांचा विचारच करत नाही. सुहास कांदेंचं मत का बाद केलं? हा संशोधनाचा विषय आहे. आम्ही त्याच कारणासाठी मुनगंटीवारांच्या मताला आक्षेप घेतला होता. मतदानावेळी धार्मिक प्रदर्शन करायचं नसतं हे माहिती असूनही अमरावतीचे एक शहाणे जे उद्योग करत होते, ते आक्षेपार्ह होते. त्यांचेही मत घटनेनुसार बाद व्हायला हवं. पण फक्त आमचं मत बाद करून रात्री उशीरा आणि पहाटे काही गोष्टी करण्यात आल्या. यांना पापकृत्य करण्याची पहाटेची फार सवय आहे. पहाटेपर्यंत त्यांचा हा उपक्रम सुरू होता. त्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही असेच उपक्रम करत राहा. महाराष्ट्राचा एकदा कायमचा घोडेबाजार करून टाका अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया फारच किचकट आहे. ज्या कारणासाठी आमचं शिवसेनेचं एक मत बाद केलं, तसाच आक्षेप आम्ही भाजपाच्या मतांवर घेतला होता. पण निवडणूक आयोगानं त्यांची मत बाद केली नाही. पण नक्की कोणाला पडणारं मत बाद झालं हे शोधण्यासाठी ७ तास घेतले. केंद्रीय यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली कसं काम करतायत? हे आम्ही डोळ्यांनी पाहात होतो. कुठे ईडी, कुठे सीबीआय, कुठे अशा प्रकारे निवडणूक यंत्रणा वापरल्या जातात का? अशी शंका येते. आमचा एक उमेदवार विजयी होऊ शकला नाही. पण याचा अर्थ समोरच्यांनी दैदिप्यमान विजय मिळवला असा नाही असेही ते म्हणाले.

आमची एक जागा भाजपाने जिंकली. पण पहिल्या क्रमांकाची ३३ मतं आम्हाला तर २७ मतं भाजपाच्या उमेदवाराला मिळाली आहे. पण निवडणूक प्रक्रिया तशी आहे. दुसऱ्या-तिसऱ्या पसंतीच्या गणितावरून जय-विजय ठरत असतात असेही त्यांनी सांगितले.

Check Also

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *