सकाळपासून आमच्या कार्यकर्त्यांवर प्राप्तिकर विभागाची धाड पडल्याच पाहत आहे. महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत मुंबईच्या प्रत्येक विभागात आणि शाखेत प्राप्तिकर विभागाची धाड पडेल असे मला वाटत आहे. आता या विभागाकडे हेच काम शिल्लक राहिले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात आणि बंगालमध्ये फक्त ठराविक लोकांनाच लक्ष का करत आहे प्रश्न देशभरातून विचारला जात आहे. शिवसेनेच्या नेतृत्वातील हे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हे मोठे षड्यंत्र असून ईडी ही भाजपाची एटीएम मशीन्स बनली असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत केला.
शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राहुल कनाल आणि संजय कदम यांच्या घरावर आज सकाळपासून प्राप्तीकर खात्याने धाडी टाकल्या. त्यानंतर ट्विट करत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपासह केंद्रीय तपास यंत्रणांवर टीकेची झोड उठविली.
प्रात्पिकर विभागाला आणि ईडीला आम्ही आतापर्यंत पुराव्यासोबत ५० नावे पाठवली. त्याची चौकशी करावी असे या तपास यंत्रणांना का वाटत नाही? किरीट सोमय्यांनी एका केंद्रीय मंत्र्यांच्या बोगस कंपन्यांची यादी ईडीला दिली. भाजपाच्या जवळचे असणाऱ्या ढवंगाळे यांच्या ७५ बोगस कंपन्यांची यादी मी ईडीकडे पाठवली होती. ईडीच्या सर्वात जास्त कारवाया या महाराष्ट्रात होत आहेत. महाविकास आघाडीच्या १४ प्रमुख नेत्यांवर ईडीने कारवाई केली आहे. भाजपा नेत्यांवर कोणत्याही तपास यंत्रणांची कारवाई झालेली नाही. ते लोक मुंबईच्या रस्त्यांवर वाटी घेऊन भीक मागत आहेत का? इन्कम आणि टॅक्स फक्त आमच्याचकडे आहे का? या सर्व कारवाया कोण नियंत्रित करतय असा सवाल करत शिवसेना लवकरच मोठा खुलासा करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
मागील पत्रकार परिषदेत मी सुमीत कुमार नरवर यांच्या नावाचा उल्लेख केला होता. बुलंदशहरमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीची संपत्ती आठ हजार कोटींच्यावर गेली. आता ती व्यक्ती मलबार हिलला राहत आहे. ईडीला लावलेल्या चष्म्यातून अशा व्यक्ती दिसत नाही. याची माहिती मी लवकरच तुम्हाला देईल. दिल्ली आणि महाराष्ट्राच्या कोणत्या भाजपाच्या नेत्याची संपत्ती त्याच्याकडे आहे हे मी आधी पंतप्रधानांना सांगणार आणि त्यानंतर तुम्हाला सांगणार असे ट्रायडेन्ट ग्रुपला आधीच्या सरकारच्या काळात महत्त्वाची कामे मिळत होती, त्याची माहितीही माझ्याकडे आहे. ही माहिती मी तपास यंत्रणांना देणार असल्याचे सांगत त्यानंतर तुम्ही मला अटकही करु शकता असे आव्हानही त्यांनी भाजपाला आणि केंद्रीय यंत्रणांना यावेळी दिले.
ईडीचे मोठे अधिकारी भाजपाच्या तिकिटावर निवडणुक लढवत आहेत. ईडी भाजपाची एटीएम मशीन बनली आहे. त्यांच्या खंडणीबाबतची संपूर्ण यादी मी पंतप्रधान कार्यालयात दिली. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात तुमचे स्वच्छ भारत अभियान हे कचरा साफ करण्याचे नसून भ्रष्ट्राचार ही नष्ट करण्यासाठी तुमचा जयजयकार होत आहे असे म्हटले आहे. तुमचे विरोधक असणाऱ्यांच्या मागे तुम्ही ईडीची कारवाई लावली. मी पंतप्रधानांना एका भागाचीच माहिती दिली आहे. अशा दहा भागांची माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जितेंद्र नवलानीच्या सात कंपन्यांनी १०० पेक्षा अधिक विकासकांकडून वसुली केली आहे. ज्यांची ज्यांची ईडीने चौकशी केली आहे त्या सर्वांनी त्यांचे पैसे जितेंद्र नवलानीच्या कंपनीमध्ये ट्रान्सफर केले. जितेंद्र नवलानी ईडीच्या अधिकाऱ्यांसाठी काम करत असून २०१७ मध्ये ईडीने दिवाण हाऊसिंग फायन्सासची चौकशी सुरु केली. अचानक दिवाण हाऊसिंगकडून जितेंद्र नवलानीच्या खात्यात २५ कोटी ट्रान्सफर झाले. मग ३१ मार्च २०२० पर्यंत एसआर वाधवान यांच्या कंपनीकडून नवलानींच्या कंपनीमध्ये आणखी १५ कोटी रुपये ट्रान्सफर झाले. याचप्रकारे अविनाश भोसलेंची चौकशी झाली. त्यानंतर अविनाश भोसलेंकडून १० कोटी रुपये नवलानीच्या सात कंपनीमध्ये ट्रान्सफर केले गेले. ईडीची चौकशी सुरु होताच नवलानींच्या कंपन्यांमध्ये १६ कोटी रुपये ट्रान्सफर झाले. ईडीच्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्यांचा नवालांनींसोबत काय संबंध आहे? आणि पैसे ट्रान्सफर का होत आहेत? असा सवालही त्यांनी केला.
आज मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. देशातल्या या सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराची तपासणी आजपासून मुंबई पोलीस करणार असून मुंबई पोलीस यासाठी सक्षम आहे. मार्क माय वर्ड असे सांगत ईडीचे काही अधिकारी लवकरच तुरुंगात जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
किरीट सोमय्या हे महान महात्मा सर्वाच्या भ्रष्ट्राचाराची प्रकरणे बाहेर काढतात. तो त्यांचा छंद आहे. सोमय्या हे एचडीआयएल, पत्राचाळ प्रकरणाबद्दल बोलत आहेत. मी त्यावेळी पीएमसी बॅंकेच्या घोटाळ्याशी संबधित असलेल्या वाधवानसोबत तुमचे व्यावसायिक संबंध काय आहेत असा सवाल केला होता. वसईमधल्या एका जमिनीच्या व्यवहारात त्यांच्या सोबत तुमची भागीदारी आहे आहे आणि त्याची चौकशी सुरु असून जून २०१५ मध्ये किरीट सोमय्या यांनी एचडीआयएल आणि जीव्हीके कंपनीने मुंबई विमानतळाची ६३ एकर जमीन हडपल्याचा आरोप केला होता. त्यासाठी एमएमआरडीमध्ये किरीट सोमय्या यांनी सातत्याने तक्रारी केल्या. ऑक्टोबर २०१५ मध्ये किरीट सोमय्या यांनी एमएमआरडीएला पत्र लिहिले. यामध्ये एचडीआएल कंपनीला १ कोटी चौरस फूट व्यावसायिक जमीन गिफ्ट म्हणून दिल्याचा आरोप केला होता. या जमिनीची किंमत ५००० कोटी रुपये असल्यामुळे या घोटाळ्याची चौकशी व्हावी, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले होते. त्यावेळी किरीट सोमय्या खासदार होते. पण त्यांनी या सगळ्याविरोधात एकदाही केंद्रीय तपास यंत्रणेकडे तक्रार केली नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर २०१६ मध्ये किरीट सोमय्या यांनी एचडीआयएल आणि राकेश वाधवान यांच्याविरोधात अचानक तक्रार करणे बंद केले. त्यानंतर १ डिसेंबर २०१६ रोजी नील सोमय्या यांची निकॉन इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकपदी वर्णी लागली. त्यानंतर निकॉन इन्फ्रास्ट्रक्टरला ५१६८ स्क्वेअर फूट क्षेत्रफळ विकसित करण्याचे अधिकार मिळाले. हे अधिकार राकेश वाधवान यांच्याकडून विकत घेण्यात आले होते. किरीट सोमय्या यांचा फ्रंटमॅन देवेंद्र लधानी यांच्या साई रिधम कंपनीच्या माध्यमातून अनेक व्यवहार झाल्याचा आरोप करत वसईमध्ये साई रिधम कंपनीच्या जमिनीवर निकॉन इन्फ्रास्ट्रक्चरला दोन प्रकल्प उभारण्याची परवानगी मिळाली. या जमिनीचे मूळ मालक राकेश वाधवान होते. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणात किरीट सोमय्या यांनी इतके आरोप केले असतानाही त्यांच्या मुलाचे राकेश वाधवान यांच्या कंपनीशी संबंध कसे असू शकतात? किरीट सोमय्या यांनी पीएमसी बँक घोटाळ्यात राकेश वाधवान यांना ब्लॅकमेल करून ही जमीन मिळवून दिली होती का? असा सावल करत किरीट सोमय्या आणि त्यांचे सुपुत्र नील सोमय्या हे दोघेही तुरुंगात जाणार असल्याचे त्यांनी निर्धारपूर्वक सांगितले.
